लोकसभेची निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले असून निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे.सत्ताधारी महायुतीमध्ये चौथा भिडू सामील होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभेच्या आधी मनसे महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे.
अमित शहांची भेट घेऊन मुंबईत परतल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन अमित शहांसोबत झालेल्या बैठकीबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनसेच्या महायुतीतील संभाव्य प्रवेशाबाबत व लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आज दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून पुढील दोन दिवसात युतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतर चर्चा सुरू आहे की, मनसेला लोकसभेच्या २ जागा मिळू शकतात. त्यातील एका जागेवर बाळा नांदगावकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यावरही नांदगावकर यांनी भाष्य केले आहे.
त्यांनी म्हटले की, यापूर्वी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मी दोनदा निवडणूक लढवली आहे. आता राज ठाकरेंनी आदेश दिल्यास गडचिरोलीतूनही निवडणूक लढण्यास तयार आहे. राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार ठरवले जाईल. याबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल.
महायुतीत मनसेला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईतील दक्षिण मुंबई हा मराठी बहुल मतदारसंघ मनसेला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर शिर्डी किंवा नाशिक मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतूनअरविंद सावंत हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार आहेत. येथे मनसेची ताकद असल्याने यावेळी ही जागा महायुतीतून मनसेला दिली जाऊ शकते. तसेच येथे राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे यांना तिकीट दिले जाऊ शकते. तसेच दुसऱ्या जागेवर बाळा नांदगावकर यांना संधी मिळू शकते.
मुंबई दक्षिण मतदारसंघात मनसेने उमेदवार उभा केल्यास येथे शिवसेना व मनसेचा जोरदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत.