Sharad Pawar on Ajit pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटूंबालाही तडे गेल्याचे दिसून येत आहे. शरद पवार -अजित पवार या काका-पुतण्यातील संघर्षाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच धार आली आहे. पवार कुटूंबात सुरूअसलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी आताटोक गाठलं आहे. जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी शरद पवार काहीही विधाने करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती. तसेच पक्षात शरद पवार स्वत: निर्णय घेतात व पक्षाचा असल्याचे सांगतात, असा आरोपही अजित पवारांनी केला होता. यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार बालबुद्धी राजकारणी असून त्यांचे वक्तव्यही तसेच असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
शरद पवारांची (Sharad Pawar) पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला. यावर शरद पवार म्हणाले की, यावर मी फार काही बोलू इच्छित नाही. मात्र राजकारणात बालबुद्धी असं वैशिष्ट्य असणारे अनेक लोक असतात. अशा बालबुद्धीतून ते काहीतरी बोलत असतात. त्याकडे आपण का लक्ष द्यायचं? असा खोचक सवाल पवारांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमधून अजित पवार सातत्याने शरद पवारांसह सुप्रिया सुळे व रोहित पवारांवर विविध आरोप करत आहेत. मात्र या आरोपांवर शरद पवारांनी आज पहिल्यांदाच जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
विविध प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणावर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार म्हणाले होते की, शरद पवारांना मी खूप जवळून पाहिले आहे. त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहीत आहे. जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील असे वाटत नाही. मी त्यांचे काम पाहिले आहे.
त्यांचा स्वभाव पाहिला आहे, ते बघता ते पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात, तो सामूहिक निर्णय आहे असं दाखवतात, मात्र स्वत: जे वाटतं तोच निर्णय घेतात, असा आरोप अजित पवारांनी शरद पवारांवर लावला होता.
संबंधित बातम्या