आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजपने तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा केला असून ‘अबकी बार ४०० पार'चा नारा दिला आहे. यावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ४०० चा दावा करणाऱ्या नरेंद्र मोदींनी फक्त १५० जागा जिंकून दाखवाव्यात, असं थेट आव्हान केले आहे. अकोला जिल्ह्यातील पारस येथे कुणबी समाज मेळावा पार पडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्रातील सरकार हे केवळ धन दांडग्यांचे अन् व्यापाऱ्यांचं आहे. यामुळे देशातील कष्टकरी व शेतकऱ्यांनी हे सरकार उलथवून टाकावं. केंद्र सरकार वस्तुस्थितीपासून दूर पळत आहेत. त्यांना आपल्या विजयासाठी अन्य पक्षात फूट पाडावी लागत आहे. भाजप हा इतर पक्षातील नेते आणि आमदार फोडून पक्षात घेईल व सरकारे पाडेल, मात्र मतदारांना ते कसे विकत घेणार?, असा सवालही आंबेडकरांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीच्या बैठकीच वंचित आघाडीने चार प्रमुख मागण्या सादर करत जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांना लोकसभेचे तिकीट द्यावे, अशी मागणी केली. याबाबात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आंबेडकर म्हणाले की, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे, हा आमचा हेतू आहे. आरक्षणाचा प्रश्न हा संसदेशी संबंधित असल्याने मनोज जरांगेंनी लोकसभा लढवण्याची विनंती आम्ही केली आहे. त्यांनी लोकसभा लढण्याबाबतचा प्रस्ताव हा पक्षातील चर्चेनंतर दिला गेला.
महाविकास आघाडीची बुधवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित होते. वंचितने २७ जागांचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान आज प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल आणि त्यांच्या जागांच्या कोणत्याही प्रस्तावाबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याच म्हणाले.
संबंधित बातम्या