मराठी बातम्या  /  elections  /  Loksabha Elections 2024 : लोकसभेसाठी महायुतीचा पहिला उमेदवार ठरला, मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेना उमेदवाराची घोषणा

Loksabha Elections 2024 : लोकसभेसाठी महायुतीचा पहिला उमेदवार ठरला, मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेना उमेदवाराची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 09, 2024 11:20 PM IST

lok sabha Election 2024 : महायुतीतील जागापाटपाबाबत चर्चांचं गुऱ्हाळ असून सुरूच असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेना उमेदवाराची घोषणा
मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेना उमेदवाराची घोषणा

Mumbai South Central Lok Sabha : महायुतीतील घटक पक्षांची जागावाटपाची बोलणी अजून सुरू असताना तसेच जागांचा फॉर्म्युला असून ठरला नसताना महायुतीच्या पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेतून शिवसेना उमेदवाराची घोषणा केली आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे रिंगणात उतरतील, याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. शिवसेना महिला सेनेचं शिवदुर्गा महिला संमेलन मुंबईच्या सायनमध्ये पार पडलं, या कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जागावाटपाबाबत बैठक घेतली होती. यानंतर हे तीनही नेते दिल्लीमध्येही जागावाटपाची चर्चा करण्यासाठी गेले होते,पण अजूनही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीने महाराष्ट्रातला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला गेला नाही.

मात्र आज महिला संमेलनात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार कोण आहे माहिती आहे ना? राहुल शेवाळे यांना निवडून द्यायचं आहे,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची अप्रत्यक्षरित्या घोषणा केली.

महायुतीप्रमाणेच महाविकासआघाडीतही जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे त्यांनीही उमेदवारांची घोषणा केली नाही, पण शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने एकूण ५ उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून रायगडमधून अनंत गिते, मावळमधून संजोग वाघेरे, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारांची घोषणा उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून केली. तर शरद पवार यांनी भोरच्या जाहीर सभेत बारामतीमधून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर केली.

WhatsApp channel