देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून अनेक पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडूनही राज्यात अनेक ठिकाणी सभा घेऊन पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावरून महायुती व महाआघाडीत जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मतदारसंघातील भोर तालुक्यात महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. या सभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुन्हा सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली.
शरद पवार म्हणाले की, बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे याच पुन्हा या मतदारसंघातून मविआच्या उमेदवार असतील. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून भोरच्या थोपटे कुटुंबियांसोबत असलेल्या सुप्त संघर्षालाही पवार यांनी आज पूर्णविराम दिल्याचं दिसून आलं. भोरमधील सभेच्या आधी शरद पवार यांनी माजी आमदार अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर जाहीर सभेत अनंत थोपटे यांचे पुत्र आणि भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना विकासकामात कायम पाठिंबा देण्याचे आश्वासन पवारांनी दिले.
यावेळी संग्राम थोपटे, सुप्रिया सुळेही महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थित होते. पवार म्हणाले की, देशाचे अनेक जणांनी नेतृत्व केलं. देशाच्या भवितव्यची चिंता कधी नव्हती. पण गेले दहा वर्ष पाहिलं असता, आता बदल केला पाहिजे असं वाटतंय.
शरद पवार यांनी संग्राम थोपटे यांना भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन दिलं आहे. जनतेला संबोधित करताना शरद पवारांनी म्हटले की, संग्राम थोपटे यांच्या हाती तुम्ही या भागाचं नेतृत्व दिलं आहे. आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की, संग्राम थोपटे... तुम्ही जे काही या तालुक्यासाठी कराल, जिल्ह्यासाठी कराल, राज्यासाठी कराल त्यामध्ये हा शरद पवार तुमच्या पाठीशी कायम राहील. यापूर्वी आपले रस्ते वेगळे होते. मात्र इथून पुढे आता शरद पवारांचा पाठिंबा असल्यानंतर विकासाबाबत, राजकारणाबाबत काय परिवर्तन होऊ शकतं हे दाखवल्याशिवाय राहणार नाही.
पवार म्हणाले की, मी कृषीमंत्री असताना शेतकरी आत्महत्या का करत आहेत, हे पाहिलं. कर्जमाफीसाठी आत्महत्या होत होत्या. सावकराकडून कर्ज काढलं जात होतं,ते सहन न झाल्याने आत्महत्या होत होत्या. आजही आत्महत्या होतात,सगळं होत असताना पंतप्रधान मोदी बघायला तयार नाहीत. सत्ता लोकांसाठी वापरायची असते. सत्तेचा गैरवापर होतोय. पंतप्रधान मोदी यांचं एकाच राज्याकडे लक्ष आहे. जे एका राज्याचे असेल तर देशाचे होऊ शकत नाही,तर अशा लोकांना निवडणुकीत हरवलं पाहिजे.