bjp complaint against Sanjay raut : पंतप्रधान मोदींची मानसिकता पूर्णपणे बिघडली आहे, भाजपने आपल्या लाडक्या नेत्यावर उपचार करावेत, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. हे वक्तव्य त्यांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत. कारण संजय राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश भाजपने निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवितास धोका असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत नरेंद्र मोदींना दफन करणार असल्याची धमकी दिली होती. हे विधान सामाजिक तेढ वाढवणारे आहे. असं भाजपने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपकडून संजय राऊत यांच्या विरोधात अमरावती, मुंबई, बीडसह राज्यात अनेक ठिकाणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची धमकी दिली होती. ही धमकी प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. शिवाय, पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा भाजपने पत्रात केला आहे. संजय राऊत यांच्या या वक्त्याव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते, असा दावा पत्रात करण्यात आला आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यांनी हे पत्र पाठवलं आहे. यात म्हटले आहे की, अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. या घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही,याची काळजी घ्यावी.
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, गेल्या १० वर्षात काय काम केलं हे पंतप्रधानांनी सांगायला हवे होते. मात्र मोदींच्या वक्तव्यामुळे वाटते की, त्यांनी प्रकृती बरी नसावी. त्यांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. काँग्रेसला टेम्पो भरून अदानी-अंबानी पैसे देत असल्याचे वक्तव्य मोदींनी केले होते. हे विधान पुरावा मानून सरकारने अदानी-अंबानीवर मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला पाहिजे. भाजपने आपल्या लाडक्या नेत्यावर उपचार करावा.