लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. सुरुवातीच्या कलानुसार राज्यात महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का दिल्याचे समोर आले आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांत महाविकास आघाडीचेअनेक उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा दबदबा अजूनही कायम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक व १०० टक्के असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार गटाचे १० पैकी १० उमेदवार आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातील ४८जागांच्या निकालाचे चित्र हळुहळु स्पष्ट होत असून यात महायुती पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे. राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत १०० टक्के यश मिळवण्याच्या मार्गात आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये १० जागांवर निवडणूक लढवली होती, त्या १० ही जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. अजित पवार फुटून गेल्यानंतर शरद पवारांनी नव्या उमेदीने पक्ष बांधणी करत तसेच दिवसरात्र प्रचार करत लोकसभेत मोठं यश मिळवताना दिसत आहे. ११ वाजेपर्यंतच्या कलामध्ये १० जागांवरील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. दिंडोरीमध्ये राज्यमंत्री भारती पवार आणि भिवंडीमधील राज्यमंत्री कपिल पाटील या केंद्रीय मंत्र्यांनाही झटका बसलाय.
महाविकास आघाडीच्या जागावाटत सर्वात कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लढवल्या होत्या. शरद पवार गटाचे १० उमेदवार रिंगणात होते. ते सर्व आघाडीवर आहेत. शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवत असलेले अमोल कोल्हे, भास्कर भगरे, बजरंग सोनावणे, नीलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे, अमर काळे, सुप्रिया सुळे, धैर्यशिल मोहिते पाटील,शशिकांत शिंदे, एस पी श्रीराम पाटीलआदी उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी २७ आणि महायुती २० जागांवर आघाडीवर आहे. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतली आहे.
शरद पवार गटाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का दिला असून येथे केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार भारती पवार पिछाडीवर पडल्या असून येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भिवंडीमध्ये राज्यमंत्री कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे
संबंधित बातम्या