मराठी बातम्या  /  elections  /  Chandrahar Patil news : सांगलीचा पैलवान लोकसभेच्या आखाड्यात उतरणार; ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

Chandrahar Patil news : सांगलीचा पैलवान लोकसभेच्या आखाड्यात उतरणार; ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 11, 2024 06:18 PM IST

Chandrahar Patil to join shiv sena UBT : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते सांगलीतून लोकसभेची निवडणूक (Sangli Lok Sabha Election) लढण्याची शक्यता आहे.

सांगलीचा पैलवान लोकसभेच्या आखाड्यात उतरणार?; हाती घेतली ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल
सांगलीचा पैलवान लोकसभेच्या आखाड्यात उतरणार?; हाती घेतली ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल

Sangli Lok Sabha Constituency : कुस्तीचा आखाडा गाजवणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) हे आता लोकसभा निवडणुकीचा आखाडा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. चंद्रहार पाटील यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत (Shiv Sena UBT) प्रवेश केला. ते शिवसेनेकडून सांगलीतून लढणार आहेत. तसे स्पष्ट संकेतच उद्धव ठाकरे यांनी दिले.

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा राज्यात राजकीय हालचालींना वेग येत आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. अनेक मतदारसंघांची अदलाबदल झाली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातही असंच चित्र आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळं शिवसेनेनं कोल्हापूर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून सांगली मतदारसंघ आपल्याकडं घेतला आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडं येणार असल्याचं दिसताच चंद्रहार पाटील यांनी इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी चंद्रहार पाटील हे आज मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी पोहोचले आणि शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून चंद्रहार पाटील यांचं पक्षात स्वागत केलं. खासदार संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते.

आधीपासूनच होते तयारीत

चंद्रहार पाटील यांनी खूप आधीपासून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यांनी लोकांशी संपर्कही साधणं सुरू केलं होतं. विविध स्पर्धांचं आयोजनही केलं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी ते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला जात असल्यानं त्यांनी शिवसेनेशी जवळीक वाढवली होती. त्यानंतर आज त्यांनी अधिकृत प्रवेश केला.

विशाल पाटील काय करणार?

सांगली लोकसभा काँग्रेसकडं असल्यानं तिथून विशाल पाटील हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पक्षातील काही नेतेही तसा दावा करत होते. मात्र, जागांच्या अदलाबदलीमुळं विशाल पाटील यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ते काय करणार याविषयी उत्सुकता होती. त्यावर त्यांनी खुलासा केला आहे. ‘काँग्रेस पक्षात तरुण पिढी आता जोमानं काम करत आहे. काही लोक पदं भोगून निघून गेले. त्यामुळं आता आमची वाट मोकळी झाली आहे. आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबण्याची तयारी आहे,’ असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.

WhatsApp channel