लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून केंद्रातील सत्ताधारी भाजपने पहिल्या १९५ उमेदवारांची आज दिल्लीत घोषणा केली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत मोदी सरकारमधील विद्यमान ३४ मंत्र्यांचा समावेश आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा जनतेचा कौल मागणार आहे. दरम्यान, भाजपने जारी केलेल्या आजच्या पहिल्या यादीत मुंबईतील भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचे नाव झळकले आहे. कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने लोकसभेचे तिकीट दिले आहे.
कृपाशंकर सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्याचे रहिवासी आहे. महाराष्ट्रात मुंबईत रोजगारासाठी आले होते. मुंबईत आल्यानंतर रोजगारासाठी मशीन ऑपरेटरसारखी कामं करत असताना त्यांनी सांताक्रूज भागात कॉंग्रेस पक्षात सक्रिय झाले. खासकरून या भागातील उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांनी समाजकार्य करत २००४ साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. ते काही काळ मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कृपाशंकर सिंह यांना गृहराज्यमंत्री सारखे महत्वाचे मंत्रीपद देण्यात आले होते. २००८-०९ दरम्यान त्यांच्यावर ३२० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीने चौकशी केली होती. २०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर सिंह हे भाजपमध्ये जाण्याचे अटकळ बांधण्यात आली होती. अखेर २०१९ मध्ये कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. भाजपने सिंह यांच्यावर मुंबई शहरातील उत्तर भारतीय मोर्चाची जबाबदारी दिली होती.
उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा खासदार निवडून आला होता. या मतदारसंघातून भाजप उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी अभिषेक सिंह हे जौनपूरमधून भाजपच्या तिकीटवर लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा होता. अभिषेक सिंह यांनी आयएएसचा राजीनामा देऊन जौनपूरमध्ये भाजपचे काम सुरू केले होते. परंतु भाजपकडून ऐनवेळी कृपाशंकर सिंह यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
संबंधित बातम्या