MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेनं बाजी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाकरेंची शिवसेना लोकसभा निवडणुकीत २१ जागा लढणार आहे. काँग्रेस १७ जागांवर उमेदवार देणार असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा लढणार आहे. सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागांचा आग्रह काँग्रेसनं सोडला आहे.
महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेकडं आज तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच जागांवरून संघर्ष सुरू होता. त्यातही सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून मतभेद टोकाला गेले होते.
सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड असल्यानं तिथं काँग्रेसच लढणार अशी भूमिका काँग्रेसनं घेतली होती. विशाल पाटील यांनी त्या दृष्टीनं तयारी देखील केली होती. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेनं तिथं दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आणि प्रचारही सुरू केला. त्यामुळं तिढा वाढला होता.
भिवंडीच्या जागेवरही काँग्रेसनं दावा केला होता. मात्र तिथं शरद पवार यांच्या पक्षानं सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं तिथंही प्रचंड नाराजी होती. या दोन्ही जागांवर आम्ही ठाम आहोत असं कालपर्यंत काँग्रेसचे नेते सांगत होते. शेवटी वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेसनं दोन्ही जागा सोडल्याचं समजतं.
मागील निवडणुकीत मुंबईतील एकही जागा जिंकू न शकलेल्या काँग्रेसला महाविकास आघाडीच्या जागावाटपात मुंबईतील दोन जागा मिळाल्या आहेत. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा काँग्रेस लढणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं केवळ एक जागा जिंकली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ४ जागा आल्या होत्या. त्यावेळी भाजपसोबत असलेल्या शिवसेनेनं तब्बल १८ जागा जिंकल्या होत्या. मागील वेळेस जिंकलेल्या जवळपास सर्व जागा शिवसेनेनं यावेळी देखील राखल्या आहेत. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज उमेदवार असल्यामुळं शिवसेनेनं ती जागा काँग्रेसला सोडली आहे.
शिवसेना - (२१)
मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम मुंबई, मुंबई ईशान्य, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, बुलढाणा, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, जळगाव, परभणी, नाशिक.
काँग्रेस - (१७)
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस - (१०)
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड