मराठी बातम्या  /  निवडणुका  /  madhavi latha : भाजपच्या हैदराबादच्या उमेदवार माधवी लता वादात; मतदान केंद्रावर जाऊन तपासली मुस्लिम मतदारांची ओळखपत्रं!

madhavi latha : भाजपच्या हैदराबादच्या उमेदवार माधवी लता वादात; मतदान केंद्रावर जाऊन तपासली मुस्लिम मतदारांची ओळखपत्रं!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 13, 2024 06:32 PM IST

Madhavi Latha at polling booth : भारतीय जनता पक्षाच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार माधवी लता यांच्या एका कृतीमुळं मोठा वाद निर्माण झाला आहे.

भाजपच्या उमेदवार माधवी लता यांची दादागिरी, मतदान केंद्रावर जाऊन तपासली मुस्लिम मतदारांची ओळखपत्रं!
भाजपच्या उमेदवार माधवी लता यांची दादागिरी, मतदान केंद्रावर जाऊन तपासली मुस्लिम मतदारांची ओळखपत्रं!

Hyderabad Lok Sabha Election 2024 : हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. माधवी लता या मतदान केंद्रावर जाऊन मुस्लिम महिला मतदारांचे बुरखे काढायला लावून त्यांची ओळखपत्रं तपासत असल्याचं समोर आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माधवी लता यांच्या या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. हैदराबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून माधवी लता यांच्यावर मलकपेट पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. लता यांच्या विरोधात भादंवि कलम १७१ सी, १८६, ५०५ (१) (सी) आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधवी लता यांची सारवासारव

माधवी लता यांनी आपल्या कृत्याचं समर्थन केलं आहे. 'मी एक उमेदवार आहे. कायद्यानुसार उमेदवाराला तोंडावरील बुरखा काढून ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे. मी पुरुष नाही, मी एक स्त्री आहे. मी खूप नम्रतेनं संबंधित मतदारांना विनंती केली होती. मी ओळखपत्रे पाहू आणि पडताळणी करू शकेन का? अशी विनंती मी केली होती. कोणी या प्रसंगाचं राजकारण करत असेल तर ते घाबरले आहेत असा याचा अर्थ आहे, असं माधवी लता म्हणाल्या.

मतदार यादीतील त्रुटींबाबतही माधवी लता यांनी चिंता व्यक्त केली. पोलीस कर्मचारी अतिशय सुस्त दिसतात, ते सक्रीय नाहीत. ते काहीही तपासत नाहीत. ज्येष्ठ नागरिक मतदार इथं येत असले तरी त्यांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत. यातील काही जण गोशामहलचे रहिवासी असले तरी त्यांची नावे रंगारेड्डी यांच्या यादीत आहेत, असं लता यांनी एएनआयला सांगितलं. लता यांनी हैदराबादमधील अमृता विद्यालयम मतदान केंद्रावर मतदान केलं आणि निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केलं. 'सबका साथ मे ही सबका विकास है, असं त्या म्हणाल्या.

हैदराबादमधून पहिल्यांदाच भाजपचा महिला उमेदवार

माधवी लता यांची लढत एमआयएमचे प्रमुख आणि चार वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले असदुद्दीन ओवेसी यांच्याशी आहे. भारत राष्ट्र समितीचे उमेदवार गड्डम श्रीनिवास यादव यांनीही ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. हैदराबाद मतदारसंघातून भाजपनं महिला उमेदवार उभे करण्याची ही पहिलीच घटना आहे.

असदुद्दीन ओवेसी हे २००४ पासून हैदराबादमध्ये राजकीय वर्चस्व राखून आहेत. यापूर्वी त्यांनी अखंड आंध्र प्रदेशात आमदार म्हणून काम केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज नऊ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९६ लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे.

WhatsApp channel