Madha Lok Sabha constituency : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. अनेक उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करून लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल केले जात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे जाहीरनामे, भाषणे, हटके आश्वासने दिली जात आहेत. सध्या सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा होत असून त्यातच माढ्यातील उमेदवाराच्या हटके रॅलीची चर्चा होत आहे. माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक उमेदवार चक्क रेड्यावर बसून आल्याने संपूर्ण मतदारसंघात याची चर्चा रंगली आहे.
राम गायकवाड (ram Gaikwad) असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहे. राम गायकवाड माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावर बसून यमराजाच्या वेशात (yamraj costume) निवडणूक अधिकारी कार्यालयात आले. देशातील वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे, असे या उमेदवाराने सांगितले.
माढा लोकसभेसाठी (madha Lok sabha) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यमराजाच्या वेशात रेड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या राम गायकवाड यांनी सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यासोबत शंभरभर कार्यकर्ते होते.
राम गायकवाड मूळचे पंढरपूरमधील रहिवासी असून माढा मतदारसंघातून ते लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. ओबीसी प्रवर्गातून टिकणारे मराठा आरक्षण मिळावे, हा मुद्दा घेऊन राम गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.
त्यांनी सांगितले की, मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, वाढत्या भ्रष्टाचारावर आळा बसावा आणि सत्ताधारी पक्षाकडून ईडी व अन्य तपास यंत्रणांचा जो गैरवापर करण्यात येत आहे, तो टाळावा, यासाठी आपण यमराज बनून आलो आहे. देशात केवळ स्वार्थासाठी राजकारण केले जात आहे. नेते जनतेला घाबरत नाहीत. त्यामुळे आता शेवटचे टोक म्हणून यमाला तर घाबरतील म्हणून या वेशात आल्याचे राम गायकवाड यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन्ही पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली जात आहे. त्यातच राम गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज चर्चेचा विषय बनला आहे.