शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीवरून जोरदार प्रहार केला आहे. नितीन गडकरींना भाजपच्या पहिल्या यादीत स्थान नाही, मात्र ज्यांच्यावर आरोप झाले त्या कृपाशंकर सिंह यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत आहे. भाजपविरोधात देशात नाराजी आहे, ईव्हीएम घोटाळा करून ते जिंकलेच तर देशात मोठा असंतोष उसळेल, असा इशाराही उद्वव ठाकरेंनी दिला. तसेच जुमल्याचे नामकरण आता गॅरंटी केल्याची टीका ठाकरेंनी मोदींवर केली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने १९५ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव नाही. यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर प्रहार केला आहे. १९५ जणांची यादी जाहीर केली असून त्यातील घराणेशाहीचा भाग वेगळाच मात्र मी मोदी आणि अमित शहा यांची नावंही ऐकली नव्हती, त्यावेळपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलं आहे आणि त्यांच्यासोबत काम केलं आहे. गडकरी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. मुंबई-पुणे महामार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करून त्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण केले होते. अशा माणसाला पहिल्या यादीतून वगळलं आहे. आणि ज्यांच्यावर बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचे आरोप केले त्या कृपाशंकर सिंग यांचं नाव आहे. ही आजची भारतीय जनता पार्टी असल्याचे टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
आज शेतकरी आणि कामगारांमध्ये मोठा असंतोष आहे, तरीही त्यांचा असा समज आहे की, हे ईव्हीएमने जिंकू शकतात. दुर्दैवाने जर हे ईव्हीएम घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल, अशी भीती मला वाटते. आम्ही तर जनतेसोबत आहोत.
गेल्या १० वर्षात अनेक सरकारी योजनांची नावे बदलली आहेत. त्याच पद्धतीने आता जुमलाचे नाव गॅरेंटी झाले आहे, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. आपण सर्व जनतेला भेटत आहोत. सर्व स्तरातील जनता नाराज आहे. यात आपण अंधभक्तांना धरत नाही.त्यांना डोळे असून दृष्टी नाही, असेच म्हणावे लागेल.