लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असून यादिवशी मोदींचा भव्य रोड शो मुंबईत होणार आहे. त्यानंतर १७ मे रोजी मोदींची शिवतीर्थावर भव्य सभा होणार असून पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येणार असून १७ मे रोजी सायंकाळी शिवाजी पार्कवर महायुतीची भव्य सभा पार पडत आहे. मनसेकडून ऐतिहासिक सभेचा टीझर लॉन्च ( modi raj Thackeray sabha teaser launch) करण्यात आला आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. पाठिंबा जाहिर केल्यानंतर राज ठाकरेंनी कणकवलीत नारायण राणे यांच्यासाठी एक सभा घेतली होती. मात्र अन्य कुठल्याही मतदारसंघात राज ठाकरेंनी सभा घेतली नव्हती. मात्र आता पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज ठाकरे यांच्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
या सभेचा ३० सेकंदाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा टिझर त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे.‘१७ मे २०२४, औरंग्याच्या औलादींना गाडायला मुंबईत एकत्र येणार, दोन कट्टर हिंदुत्ववादी. ऐतिहासिक मोदी-राज भेटीचे साक्षीदार व्हायला चला शिवतिर्थावर’, असं म्हणत हा टिझर लॉन्च करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंसह दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर करत यावर शिक्कामोर्तब केलं होतं.
त्यानंतर अमित ठाकरेंनी पुण्यात बोलताना राज ठाकरे-मोदी एकाच व्यासपीठावर येणार असल्याचे संकेत दिले होते. याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज ठाकरेंनी अशी कोणतीही सभा आपण घेणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता ते मोदींसोबत व्यासपीठ शेअर करणार आहेत. मोदींसमोर राज ठाकरे कोणावर बरसणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या