राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी व महायुतीत जोरदार खडाजंगी होत आहे. राज्यकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेनाउद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमरावतीतील प्रचार सभेत बोलताना नवनीत राणा (Navneet rana) यांच्यावर जोरदार टीका केली. राणांवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. ती बाई ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला खुणावेल, पण तुम्ही जायचं नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
खासदार संजय राऊत दोन दिवसापासून अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एका सभेत बोलताना त्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणांवर टीका केली. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही, असं संजय राऊत म्हणाले. या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमरावतीला एक संस्कृती आहे, अमरावती विदर्भाचे नाक आहे. अमरावतीची प्रतिष्ठा गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र आणि दिल्लीत धुळीस मिळाली आहे. देशाच्या छाताडावर मोदी (Narendra Modi) नावाचा जो राक्षस बसला आहे त्याला खाली ओढण्यासाठी नवनीत राणांचा पराभव केला पाहिजे.
संजय राऊत म्हणाले, विकासाचं पोरगं तुम्हाला झालं नाही, त्यानंतर तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचे नाही. सर्वांनी लक्षात घ्यायचे आपला उमेदवार बलवंत वानखेडे आहे. रात्र वैऱ्याची आहे. रात्रीस खेळ चाले, असे राऊत म्हणाले.
भाजप व शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, जे घाबरले ते पळाले, ते गद्दार झाले. पळपुटेपणा करणाऱ्यांकडून कधीच इतिहास लिहिला जात नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात इतका लाचार मुख्यमंत्री कधीच बघितला नाही. यांना आठ-आठ दिवस वेटिंगवर ठेवले जाते. उठसूट दिल्लीला जातात. मोदीवर बोलताना राऊत म्हणाले की, ५६ इंचाची छाती महाराष्ट्रात नाही, तर लडाखमध्ये दाखवा. हा महाराष्ट्र आहे, कधीच मोदी, शहांपुढे गुडघे टेकणार नाही.
ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य समजून कामाला लागा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश समजून ताकदीने कामाला लागा, असे आदेशही राऊतांनी शिवसैनिकांना दिले.