मराठी बातम्या  /  elections  /  Loksabha Election : अमरावतीत भाजपाचं टेन्शन वाढलं; नवनीत राणांविरोधात 'प्रहार'चा उमेदवार रिंगणात

Loksabha Election : अमरावतीत भाजपाचं टेन्शन वाढलं; नवनीत राणांविरोधात 'प्रहार'चा उमेदवार रिंगणात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 29, 2024 04:30 PM IST

Amravati Lok sabha Election : प्रहार संघटनेने अमरावती मतदारसंघातून भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. शिवसेना ठाकरे गटातून आलेले दिनेश बूब यांना प्रहारने निवडणुकीत उतरवलं आहे.

नवनीत राणांविरोधात 'प्रहार'चा उमेदवार रिंगणात
नवनीत राणांविरोधात 'प्रहार'चा उमेदवार रिंगणात

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं आपल्या सातव्या यादीत अमरावतीमधून स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. महायुतीतील घटक प्रहार संघटनेचे बच्चू कडू, शिवसेनेचे आनंदराव अडसूल तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून भाजपने नवनीत राणा यांच्यावर विश्वास दाखवला तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हनुमान चालिसा आंदोलन केल्याचे बक्षीस दिले.

नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कटू यांनी निकालातून आपली ताकद दाखवण्याचा इशारा दिला होता. तसेच मतदारसंघात आढावा घेऊन राणांविरोधात उमेदवार देणार असल्याचे म्हटले होते. आता प्रहारने या लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिला आहे. ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बूब यांना नवनीत राणांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठकीत अमरावतीमधून संघटनेचा उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आम्ही अमरावतीत मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेकडून दिनेश बूब यांना निवडणुकीत उतरवलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून बूब प्रहारचे उमेदवार असतील, अशी मी जाहीर घोषणा करतो, असं त्यांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाकडून दिनेश बूब लोकसभा लढण्यास इच्छुक होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिल्याने त्यांनी प्रहारकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. अमरावती मतदारसंघात संघटनेचे दोन आमदार आहेत. आम्हाला लोकसभेची एक जागा हवी होती. मात्र महायुतीने दिली नाही.

दिनेश बूब म्हणाले की, प्रहार संघटना शिवसेनेतूनच निर्माण झाली आहे. तो आमच्यासाठी वेगळा पक्ष नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्न नाही. शिवसेनेचा भगवा हातात घेऊनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी राजीनामा मागितला तर देऊ, असे बूब म्हणाले.

WhatsApp channel