मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Mumbai North Loksabha: उत्तर मुंबई मतदारसंघ ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी; मीच जायंट किलर ठरणार: भूषण पाटील

Mumbai North Loksabha: उत्तर मुंबई मतदारसंघ ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी; मीच जायंट किलर ठरणार: भूषण पाटील

May 17, 2024 02:16 PM IST

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या उमेदवारीमुळे उत्तर मुंबई मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात गोयलविरोधात कॉंग्रेस उमेदवार भूषण पाटील निवडणूक लढवत आहे. पाटील यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या मुंबई कार्यालयात भेट देऊन आपली मते मांडली.

Congress candidate from Mumbai (North) Lok Sabha Constituency Bhushan Patil
Congress candidate from Mumbai (North) Lok Sabha Constituency Bhushan Patil

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध कॉंग्रेसच्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर असा सामना झाला होता. त्यात शेट्टी यांचा विजय झाला होता. यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांच्या विरोधात मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भूषण पाटील यांनी ‘हिंदुस्थान टाईम्स’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

ट्रेंडिंग न्यूज

प्रश्न- भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांची उमेदवारी फार आधी जाहीर झालेली होती. तुमची मात्र फारच उशिरा जाहीर झाली. तुमच्याकडे प्रचारासाठी फारसा वेळ शिल्लक राहिला नाही?

उत्तर: उलट त्यांना (गोयल) निवडणुकीच्या तयारीसाठी फारसा वेळ मिळालेला नाही. गेली ३२ वर्षे मी या भागात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अथक परिश्रम घेत आहे. मतदारसंघातली प्रत्येक गल्ली आणि रस्त्याची मला माहिती आहे. जनता मला ओळखते. ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. पक्षाला लोकांमध्ये असणारी व्यक्ती हवी होती. म्हणूनच काँग्रेसने माझी निवड केली. त्यामुळे मी येथे नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून आहे. मी ‘जायंट किलर’ ठरेल आणि ते लोकांना ४ जूनला दिसणार आहे.

प्रश्न- उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या आव्हानाला तुम्ही कसे सामोरे जात आहात?

उत्तर : माझ्यासाठी सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे मी स्थानिक रहिवासी आहे. माझ्या प्रतिस्पर्ध्याचा उत्तर मुंबईशी काहीही संबंध नाही. गेल्या दशकभरात त्यांनी किती वेळा या मतदारसंघाला भेट दिली, हे कृपया भाजपला विचारा. तुम्हाला याचे उत्तर मिळणार नाही. विधानसभा मतदारसंघांची हद्द आणि आतील प्रभागांची त्यांना कल्पनाही नसेल. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्यानंतर ते मंत्री झाले. त्यांना 'जनसेवा' म्हणजे काय हे समजत नाही. हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला असल्याचे गृहीत धरून भाजपने त्यांना उमेदवारी दिली. पण आधीच्या निवडणुकीत शिवसेना हा मित्रपक्ष त्यांच्यासोबत होता याचा त्यांना विसर पडला आहे. यावेळी ते एकटेच लढत आहेत. यावेळी काँग्रेसला शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि 'आप'चा पाठिंबा आहे.

प्रश्न- मात्र, शिवसेना महायुतीचा भाग असून या निवडणुकीत ते भाजपसोबत प्रचार करत आहेत.

उत्तर : खरी शिवसेना त्यांच्यासोबत नाहीच. महायुतीत सामील झालेल्या ज्येष्ठ नेत्यांना नगरसेवकांचा पाठिंबा नाही. पण माझ्या मतदारसंघातील नगरसेवक मला पूर्ण पाठिंबा देतात.

प्रश्न- गुजराती मतदारांमध्ये भाजपचा जनाधार खूप मजबूत आहे. गोयल हे व्यापारी, दुकान मालक आणि व्यापारी समुदायाच्या नेत्यांना भेटत आहेत.

उत्तर : मला गुजराती मते मिळतील का, असा प्रश्न विचारला जातो. या मतदारसंघात ३२ टक्के मराठी मतदार आहेत, त्याखालोखाल २८ टक्के गुजराती मतदार आहेत. या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतदारांची मोठी संख्या आहे. भाजप जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण करतोय. हिंदू आणि मुस्लीम आणि आता गुजराती आणि मराठी यांच्यातील तथाकथित विभाजनाबद्दल भाजपवाले बोलत सारखं राहतात. पण माझी बायको गुजराती-जैन आहे आणि मी गेली अनेक वर्षे गुजरात्यांमध्ये वावरतो आहे. छोट्या व्यापारी आणि व्यावसायिकांबाबत बोलायचे झाले तर वस्तू व सेवा कर (जीएसटी) ज्या पद्धतीने लागू करण्यात आला, त्यामुळे ते नाराज आहेत.

प्रश्न- तुमच्या मतदारसंघातील प्रमुख मुद्दे कोणते?

उत्तर : इमारतींचा पुनर्विकास, रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, दहिसर टोलनाक्यावरील समस्या, फेरीवाल्यांचे प्रश्न आणि पर्यावरणाच्या समस्या या मतदारसंघाला भेडसावतात. उदाहरणार्थ, बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास, कांदिवली पूर्वेकडील ऑर्डिनन्स डेपो आणि दहिसर येथील नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मालकीच्या जागेचा पुनर्विकास रखडला आहे. गोराई आणि मनोरीतील ग्रामस्थ फेरीसेवेवर अवलंबून असतात. ते रुग्णालये, पिण्याचे शुद्ध पाणी अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी १७० कोटी रुपये खर्चून अंडरवॉटर पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव होता, मात्र तो अद्याप मार्गी लागला नाही. गर्दी कमी होण्यासाठी येथील रेल्वे प्रवासी हे चांगल्या रेल्वे स्थानकांच्या प्रतीक्षेत आहेत. पादचाऱ्यांसाठी अधिक जागा निर्माण करण्यासाठी योग्य हॉकिंग झोन विकसित करण्याची गरज आहे. दहिसरहून मिरा-भाईंदरच्या दिशेने टोल नाक्याचे स्थलांतरही रखडले आहे.

प्रश्न- तुमचा जमिनीवर डोळा आणि कान लागला आहेत. पण तुमचे विरोधी उमेदवार हे राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते येथे येत आहेत. काँग्रेसचे नेते तुमचा प्रचार करताना दिसत नाहीत. काही प्रॉब्लेम आहे का?

उत्तर : माझ्या प्रचारासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची गरज आहे का, असा प्रश्न मला विचारण्यात आला. सभा घेण्यावर माझा विश्वास नाही म्हणून मी त्याला नकार दिला. त्याऐवजी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पदयात्रा काढण्यावर माझा भर आहे. मोठे नेते सर्वसामान्य मतदारांना प्रभावित करू शकतील, असे मानले जात आहे. पण मी लोकांशी थेट संपर्क साधतो, हे खूप महत्त्वाचं आहे. भाजप घाबरला असून ही लढत त्यांच्यासाठी केकवॉक ठरणार नाही याची त्यांना जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते प्रचारासाठी गर्दी करत आहेत.

प्रश्न- आपल्या मतदारसंघात गणपत पाटील नगर, पोईसर अशा मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. त्यासाठी तुमच्या काय योजना आहेत?

उत्तर : झोपडपट्टी पुनर्विकास आवश्यकच आहे. पण तो प्रत्यक्ष व्हायला हवा. भाजपच्या माझ्या विरोधकांनी सर्व झोपडपट्ट्या हटवून 'उत्तर मुंबई'चे 'उत्तम मुंबई'मध्ये रूपांतर करण्याचे आश्वासन दिले आहे. खारफुटीच्या जमिनीवर झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मग धारावीप्रमाणे त्यांना इथली जमीन द्यायची आहे का? त्याऐवजी त्यांनी (गोयल) ते जिथून आले आहेत, तिथेच परत जावे.

WhatsApp channel