Kolhapur Lok Sabha constituency : कोल्हापूर जिल्ह्यात आज सभांचा धडाका होता. महाविकास आघाडी व महायुतीचीही आज सभा पार पडली. महाविकास आघाडीच्या इचलकरंजीतील सभेत हजारो लोकांची गर्दी केल्याने येथे चेंगराचेंगरीची (stampede in ichalkaranji) घटना घडली. नागरिकांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती त्यावेळी त्यांच्यात चेंगराचेंगरी झाली.
इचलकंरजीतील सभास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने मैदान अपुरे पडले. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकरांनी नागरिकांना डी झोनमध्ये बसवण्याची पोलिसांना विनंती केली. बसायला जागा मिळत नसल्याने नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांच्या गोंधळामुळे शरद पवारांना काही वेळ आपलं भाषण थांबवावे लागलं होते. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर डी झोनमध्ये जाण्यासाठी नागरिकांची पळापळ झाली. त्यात काही नागरिक जमिनीवर कोसळल्याचे दिसून आले.
आज (बुधवार) सायंकाळी इचलकरंजीत शरद पवार (sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची संयुक्त सभा पार पडली. या नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठीच्या लोकांनी गर्दी केल्याने सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हजारो लोक रस्त्यावर उतरले होते.
यावेळी झालेल्या चेंगराचेगरीत काहींना दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने यात कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.
इचलकरंजीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. भाजपने राज्यात केलेल्या पाडापाडीचा सूड आपण घेणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
शरद पवारांनी कोल्हापूरच्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पवार म्हणाले की, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना राज्यातील अनेक भागात जायच्या आणि देशातील गरिबी कशी घालवता येईल, यावर विचार मांडायच्या. देशाच्या सर्वच पंतप्रधानांनी हे काम केलं. मात्र, सध्याचेपंतप्रधान महाराष्ट्रात येतात आणि त्यांना दोन लोकांची आठवण प्रकर्षणाने होते. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार.
या दोघांवर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. मोदीसाहेब,तुम्ही महाराष्ट्रात कितीदाही आलात, कितीही टीका केली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्र बोलणार नाही. पण, ज्यादिवशी संधी मिळेल त्यादिवशी तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट हल्लाबोल पवारांनी केला.
संबंधित बातम्या