LS Election Results 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल उद्या, ४ जून रोजी लागत असून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून येतील, असा अंदाज एक्झिट पोलनी वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची शक्यता आहे. सलग तीन वेळा निवडून येणारे नेहरू हे एकमेव पंतप्रधान आहेत.
पंडित नेहरू १९४७ ते १९६४ अशी १७ वर्षे देशाचे पंतप्रधान होते. ते सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, १९५१ च्या पहिल्या निवडणुकीनंतर नेहरू पुन्हा सत्तेत आले होते. १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या काँग्रेसनं ३७१ जागा जिंकल्या व सत्ता राखली.
लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षानं आतापर्यंत जिंकलेल्या लोकसभेच्या सर्वाधिक जागा (३७१) होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३५० ते ३७० जागा मिळतील. अर्थातच, एकट्या भाजपला त्यापेक्षा कमी जागा मिळतील. त्यामुळं नेहरूचा ३७१ जागा जिंकण्याचा विक्रम अबाधितच राहण्याची दाट शक्यता आहे.
केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यापासून भाजपनं व खुद्द मोदी हे सातत्यानं आपल्या भाषणांतून नेहरूंचा उल्लेख करत असतात. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक चुकीच्या निर्णयांसाठी भाजप थेट पंडित नेहरू यांना जबाबदार धरते. तर, भाजपचे विरोधक हे नेहरू यांनी आधुनिक भारताचा पाया रचला असं मानतात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे तुरुंगात काढलेल्या नेहरू यांची लोकप्रियता त्या काळी अफाट होती. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं तिन्ही निवडणुका निर्विवाद जिंकल्या. नरेंद्र मोदी यांचे समर्थक मोदींनाच आजवरचा सर्वात लोकप्रिय पंतप्रधान मानतात. भाजपप्रणित आघाडीला ४०० पार जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी यांच्या अफाट लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. त्यामुळंच ४०० पार हा नारा भाजपसाठी महत्त्वाचा आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ आणि विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून शेवटच्या मतमोजणीपर्यंत सुरू राहणार आहे. उद्या जाहीर होणाऱ्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोणत्या राजकीय पक्षाचं किंवा आघाडीचं सरकार स्थापन होणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर येतील का, हे या निकालातून स्पष्ट होणार आहे.
ओडिशा आणि आंध्र प्रदेशविधानसभा निवडणुकीचे निकालही मंगळवारी जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणुकीबरोबरच या दोन राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान झालं. विद्यमान आंध्र प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ ११ जून रोजी आणि ओडिशा विधानसभेचा कार्यकाळ २४ जून रोजी संपत आहे. या वर्षी दोन्ही राज्यांतील विधानसभा मतदारसंघांनी आपला पुढचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी मतदान केलं.