Loksabha Election Fact Check: संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह अन्य पक्षांनी आपपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने यावेळी ४०० हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि इतर पक्षही आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एक पत्र व्हायरल होत आहे, १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
व्हॉट्सॲपसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या या पत्रात २८ मार्चपासून लोकसभा निवडणूक २०२४ साठी नामांकन सुरू होईल, असे म्हटले आहे. तसेच १९ एप्रिलला मतदान होईल आणि २२ मेला मतमोजणीला सुरुवात होईल आणि याच दिवशी निकालही जाहीर केला जाईल. त्यानंतर ३० मे रोजी नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा व्हायरल पत्राद्वारे करण्यात आला आहे. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पत्राच्या फोटोसह निवडणूक आयोगाने एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी असे म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या वेळापत्रकाबाबत एक बनावट पत्र व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहे. पंरतु, हे पत्र खोटे आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना पत्रकार परिषद बोलावली जाईल. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांचे व्हायरल झालेले पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणूक कधी होणार, उमेदवारी अर्ज कधी सुरू होणार आणि किती टप्प्यात मतदान होणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळतील.