Surat Lok Sabha News : निवडणुकीच्या आधीच गुजरातमध्ये भाजपनं उघडलं विजयाचं खातं; हे कसं घडलं?
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Surat Lok Sabha News : निवडणुकीच्या आधीच गुजरातमध्ये भाजपनं उघडलं विजयाचं खातं; हे कसं घडलं?

Surat Lok Sabha News : निवडणुकीच्या आधीच गुजरातमध्ये भाजपनं उघडलं विजयाचं खातं; हे कसं घडलं?

Apr 22, 2024 05:39 PM IST

Surat Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच गुजरातमध्ये भाजपनं विजयाचं खातं उघडलं आहे. सुरत लोकसभा मतदारसंघात हे घडलं आहे.

गुजरातमध्ये निवडणुकीच्या आधीच भाजपनं उघडलं विजयाचं खातं; हे कसं घडलं?
गुजरातमध्ये निवडणुकीच्या आधीच भाजपनं उघडलं विजयाचं खातं; हे कसं घडलं? (PTI)

lok Sabha Election 2024 : 'अब की बार ४०० पार' अशी घोषणा देत लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या भाजपसाठी गुजरातमधून खूषखबर आली आहे. येथील सुरत लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुकेशभाई दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या संदर्भात ट्वीट केलं असून विजयी उमेदवार मुकेशभाई दलला यांचं अभिनंदन केलं आहे. सुरत लोकसभा मतदारसंघात एकूण १० अर्ज दाखल करण्यात आले होते. तिथं प्रमुख लढत भाजपचे खासदार मुकेश दलाल व काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होती. मात्र, प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यानंतर आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन समाज पक्षाचे प्यारेलाल भारती व अपक्षांसह एकूण आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं भाजपला पहिला विजय मिळाला.

बनावट स्वाक्षऱ्यामुळं अर्ज बाद

सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून नावं असलेल्या तिघांनीही संबंधित अर्जावरील स्वाक्षरी आपली नसल्याचं सांगितलं. या आक्षेपानंतर कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. सुरतमधील काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाळा यांच्या उमेदवारी अर्जाबाबतही हाच प्रकार घडला आहे. त्यामुळं काँग्रेस शर्यतीतून बाद झाला.

निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीत अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये विसंगती आढळल्यानंतर उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला.

सुरतकडून पहिले कमळ

‘सुरतनं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पहिलं कमळ अर्पण केलं,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी विजयी उमेदवार मुकेश दलाल यांचं अभिनंदन केलं आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील उर्वरीत जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.

काय आहे नियम?

निवडणूक नामनिर्देशन नियमावलीनुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षानं मान्यता दिलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यासाठी मतदारसंघातील एका मतदाराची आवश्यकता असते. मात्र, उमेदवार अपक्ष असल्यास किंवा मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा उमेदवार नसल्यास त्याच्या अर्जावर मतदारसंघातील दहा मतदारांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणं बंधनकारक आहे. काँग्रेसनं या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या