Lok sabha elections 2024 : काँग्रेसने मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंच्या हत्येचा मुद्दा उकरून काढल्यानंतर यावरून आता राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. काँग्रेस नेते व विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होते की, करकरेंची हत्या दहशतवाद्यांनी नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदनगरच्या सभेतून हल्ला चढवला. मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांचा हा अपमान आहे. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात एकही सीट मिळू देऊ नका, असे आवाहन मोदींनी केलं.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मोदींची अहमदनगर येथील सावेडी भागात सभा पार पडली. यावेळी मोदींनी इंडिया आघाडी तसेच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
मोदी म्हणाले, इंडी आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही. त्यामुळे सीमापार असलेली काँग्रेसची बी टीम सक्रीय झाली आहे. मुंबईवर हल्ला पाकिस्तानने केला होता, हे जगजाहीर आहे. आपल्या जवानांना पाकिस्तानने मारले.
मुंबईतील निर्दोष लोकांना कुणी मारलं, हे जगाला माहिती आहे. मात्र काँग्रेस दहशतवादी निर्दोष असल्याचे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणतात अजमल कसाब निर्दोष आहे. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांचा हा मोठा अपमान आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेस दिवसेंदिवस खालच्या पातळीवर घसरत आहे. त्यामुळे शहिदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला राज्यातून एकही जागा मिळू न देण्याची तजवीज करा.
इंडी आघाडीकडून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे.दुसरीकडे भाजपव एनडीए आघाडीला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एनडीएच्या जाहीरनाम्यामध्ये विकास, गरिबाचे कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा आदी विषयांना प्राधान्य आहे. परंतु यापैकी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आहे? असा सवालही त्यांनी सभेत केला.त्यामुळे ४ जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी डेट निश्चित झाली आहे. इंडी आघाडी मातीच्या ढिगाऱ्यासारखी कोसळणार, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
इंडी आघाडी सर्वांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देणार आहे. संविधान धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे हे लोक संविधान बदलायला निघाले आहेत, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला आहे.