Lok Sabha Elections 2024 : कर्नाटकमध्ये समोर आलेल्या कथित सेक्स स्कँडलबाबत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहे. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान आजकाल महिलांच्या मंगळसुत्राबाबत बोलतात, त्यांच्या दागिन्यांवर बोलतात. पण जेव्हा देशातील महिला ऑलिम्पिकपटूंवर अत्याचार होत होता, तेव्हा ते कुठे होते. जेव्हा हाथरस, उन्नावमध्ये महिलांवर बलात्कार करून त्यांना जिवंत जाळले गेले तेव्हा मोदींनी कुणाची बाजू घेतली होती. त्यांच्या सरकारने आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदी ज्यांच्यासाठी मतदान त्यांनी (माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना) (Prajwal revanna) हजारो महिलांशी दुष्कर्म केले आहे. यावर पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा काय म्हणतात? पीएम मोदी, देशातील कोट्यवधी महिला याचे उत्तर मागत आहेत. मंगळसुत्रावर बोलण्यापूर्वी देशातील महिलांच्या प्रश्नाचे उत्तर द्या.
प्रियंका गांधी म्हणाल्या, इतके भयानक काम करणाऱ्यासाठी मोदींनी व्यासपीठावरून मते मागितली. आता हे स्कँडल उघडकीस आल्यावर मोदी गप्प का? त्यांच्याकडे तर प्रत्येक गोष्टीची माहिती असते, की, कोण कुठे जात आहे? मी चार दिवस मुलीला भेटायला गेल्यावर म्हणत होते प्रियंका परदेशात गेल्या आहेत. आता एक राक्षस इतके मोठे कांड करून परदेशात पळून गेला आहे, तर यांना माहिती कसे पडले नाही? पंतप्रधानांनी मंचावर येऊन याचे उत्तर द्यावे. ते कोणाच्या मंगळसूत्रावर बोलण्याच्या लायकीचे नाहीत. कारण प्रत्येक वेळी ते महिलांवर अत्याचार करणाऱ्याच्या बाजुने उभे राहतात.
कर्नाटक सेक्स स्कँडलशी संबंधित शेकडो व्हिडिओ समोर आले आहेत. त्याच्या एक दिवस आधी रविवार (२८ एप्रिल) या प्रकरणी कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लैंगिक शोषण व महिलांचा पाठलाग करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हासनचे विद्यमान खासदार व लोकसभा निवडणुकीतील उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कथित सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे, प्रज्वल आणि त्यांचे वडील रेवन्ना यांच्याविरोधात त्यांच्या घरातील मदतनीसांनी देखील २०१९ ते २०२२ या काळात अनेकवेळा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एफआयआर देखील दाखल केला होता.
एचडी रेवन्ना आणि प्रज्वल रेवन्ना त्यांच्या घरातील महिला कामगारांचं लैंगिक शोषण करायचे. रेवण्णा यांची पत्नी घरी नसली की ते कर्मचारी महिलांना स्टोअररूममध्ये बोलवायचे आणि त्यांना स्पर्श करायचे. महिलांवर लैंगिक अत्याचार करायचे.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३५४ अ (लैंगिक छळ), ३५४ ड (पाठलाग), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ५०९ (महिलेचा विनयभंग) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपांची चौकशी करण्याचं काम आता एसआयटीकडं देण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या