Lok Sabha Election Results 2024 Rahul Gandhi: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेला लोकसभा निवडणूक २०२४चा निकाल आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे. देशभरातील सगळेच नागरिक या निकालाकडून डोळे लावून बसले आहेत. एकीकडे भाजप काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये लढत दिसत असताना, दुसरीकडे सगळ्यांचं लक्ष राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघांकडे लागलं आहे. राहुल गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ‘भारत जोडो यात्रा’ ते ‘भारत न्याय यात्रा’ अशा अनेक माध्यमातून ते अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या याच यात्रांचं फळ आता त्यांना मिळताना दिसत आहे.
‘भारत जोडो यात्रे’ अंतर्गत राहुल गांधी यांनी पायी चालत देशभरातील लोकांची भेट घेतली. त्यामुळे यावेळी काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करताना दिसतोय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष असणारे खासदार राहुल गांधी यांनी यावेळी नेत्रदीपक कामगिरी केली असून, वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदार संघात ते सध्या आघाडीवरच दिसत आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी विजय मिळाला तरी आता राहुल गांधी यांना नियमांप्रमाणे एक मतदार संघ सोडावा लागणार आहे. आता कोणता मतदार संघ सोडणार, यावर स्वतः उत्तर दिलं आहे.
नुकतीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना कोणता मतदार संघ सोडणार?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, ‘नियमांप्रमाणे एक मतदार संघ सोडवा लागणार आहे, हे माहित आहे. परंतु, मी अद्याप याविषयीचा निर्णय घेतलेला नाही. लोकांशी बोलून आणि वेळ घेऊनच मी हा निर्णय घेणार आहे. सध्यातरी मी याचा विचार केलेला नाही.’
दरम्यान भाजपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यासारख्या महत्त्वाच्या राज्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचा बहुमताने विजय आता काहीसा अनिश्चितच दिसत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही जागांवर त्यांना भरघोस मतं मिळाली असून, मोठ्या फरकाने ते सध्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आघाडीवर आहेत.
राहुल गांधी यांना वायनाड मतदार संघात आतापर्यंत ६ लाख ४७ हजार ४४५ मतं पडली असून, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला आतापर्यंत केवळ २ लाख ८३ हजार २३ मतं मिळाली आहेत. तर, भाजपच्या के सुरेंद्रन यांना १ लाख ४१ हजार ४५० मतं मिळाली आहेत. म्हणजेच राहुल गांधी सध्या ३ लाख ६४ हजार ४२२ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे राहुल गांधी येथून विजयी होणार हे गृहीतच धरलं जात आहे. दुसरीकडे, रायबरेली मतदारसंघातून देखील राहुल गांधींना मोठा विजय मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. रायबरेली मतदार संघात त्यांना सध्या ६ लाख ८४ हजार ५९८ मते पडली आहे. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे दिनेश सिंह यांना २ लाख ९५ हजार ८५६ मतं पडली आहेत. त्यामुळे राहुल गांधी या जागेवर देखील भरघोस मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे, प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतांमधील हा फरक भरून काढणं शक्य नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे रायबरेलीच्या जागेवर देखील राहुल गांधींचा विजय निश्चित असल्याचं म्हटलं जातं.
संबंधित बातम्या