Ajit Pawar twitar post : राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिले होते. शरद पवार यांच्या बारामती येथून पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपटले होते. तर राज्यात देखील ५ जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले होते. मात्र, काल लागलेल्या निवडणूक निकालात अजित पवार यांचा दारुण पराभव झाला. हा लज्जास्पद पराभव झाल्यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना धीर देणारे द्विट केले आहे. यात त्यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, कुलेही अपयश हे अंतिम नसतं, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे, असे म्हणत धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
देशात लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. महाराष्ट्रात भाजप आणि महायतिचा मोठा पराभव झाला आहे. त्यात राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना महायुतीत सहभागी करून घेत त्यांना ५ जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, या पाच पैकी चार जागांवर अजित पवार यांच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. बारामतीमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही तब्बल दीड लाख मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर कार्यकर्ते आणि पदक्षिकाऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टची चर्चा आता होत आहे.
अजित पवार यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे आभार मानतो. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. असे पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील, असे लिहित पवार यांनी कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
हे रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे एकमेव उमेदवार निवडून आले आहे. अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे, असा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या