नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता. या जागेवर अजित पवार गट, शिंदे गट व भाजपने दावा केला होता. अखेरच्या क्षणी ही जागा शिंदे गटाकडे गेली. या जागेवर हेमंत गोडसेयांना उमेदवारी जाहीर केली. गोडसेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यापूर्वीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो आणि प्रचारसभा होणार आहे. मात्र मराठा समाज्याच्या निर्णयाने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
मराठा क्रांती मोर्चाने नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मराठा आरक्षणाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या, मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा न देणाऱ्यांना पाडण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांना पाठिंबा देत असल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आज नाशिक दौऱ्यावर आले असून एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतयांनी त्यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार असून त्यासाठी प्रचाराचा धुरळा उडत आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये येताना आपल्या हेलिकॉप्टरमधून पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचा दावा राऊतांनी केला होता. याचा एक व्हिडिओही संजय राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.