Maharashtra Lok Sabha Opinion Poll : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीमध्ये काट्याची टक्कर होत आहे. महाराष्ट्रात काय निकाल लागणार याची अनेकांना उत्सुकता लागली असून या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध झालेल्या अंतिम ओपिनियन पोलनुसार (opinion poll) गेल्या दोन महिन्यात राज्यात हवा पालटल्याचे दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडीला केवळ १८ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे दिसत असून महायुती ३० जागांवर विजयी होणार असल्याचे सर्वेमधून दिसत आहे.
या ओपनियन पोलमध्ये अनेक जागांवर धक्कादायक निकाल लागणार असल्याचे समोर आले आहेत. कोल्हापूर, बारामती, परभणी, माढा, हातकणंगले आणि मुंबईतील जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये अनपेक्षित निकाल लागू शकतात. एबीपी -सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील सर्व म्हणजे ४८ मतदारसंघात सर्वेक्षण केले गेले. त्यातील आकडेवारीनुसार कोणता उमेदवार आघाडीवर आणि पिछाडीवर राहणार, याचे निष्कर्ष समोर आले आहेत.
लोकसभेचे निकाल महाराष्ट्रात कसे लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महाराष्ट्रात निवडणुकीपेक्षा बदल्याचे राजकारण रंगले आहे.मविआकडून सर्व जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत तर महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. तरीही त्या जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचे सर्वेमधून दिसत आहे.
काँग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षांपेक्षा राष्ट्रवादीचे दोन गट आणि शिवसेनेचे दोन गटात तुंबळ सामना होत आहे. त्यातच आता ओपीनियन पोल समोर आल्याने कोणाला किती जागामिळणार, याची आकडेवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप प्रणित महायुतीला सर्वोधिक ३० जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला १८ जागांवर यश मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे अन्य व अपक्षांच्या खात्यात एकही जागा जाणार नसल्याचे दिसते.
ओपीनियन पोलनुसार कोणाला किती मतदान होणार याची टक्केवारीही समोर आली आहे. यामध्ये महायुतीला ४५ टक्के तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. अन्य उमेदवार व पक्षांच्या खात्यात १४ टक्के मतदान जाणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना २१, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार १० आणि काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवत आहेत. महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवत असून अजित पवार गट केवळ ४ जागा लढवणार आहे.