लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. यामध्ये मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाबरोबरच राज्यातील राज्यातील १३ जागांवर मतदान पार पडले. प्रचंड उकाडा व मतदान यंत्रातील बिघाडामुळे अनेक मतदान केंद्रांवर संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू होती. अनेक मतदारांनी मतदान न करताच माघारी परतण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघात ही घटना घडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात (Rahul narvekar) उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने दोन गटात वाद झाला.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील कुलाबा येथे भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी आले असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राहुल नार्वेकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ठाकरे ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ अशी घोषणाबाजी गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली..
महाआघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांचाही राडा -
कुलाब्याबरोबरच सायन येथेही महाआघाडीतील काँग्रेस व शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. काँग्रेस कार्यकर्त्याने धमकावल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड सायन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. भाजप आमदार कॅप्टन तमिल सेल्वम, आमदार कालिदास कोळंबकर हे देखील यावेळी सायन पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
संबंधित बातम्या