Lok Sabha Election 2024: मुंबईच्या शिवाजी पार्क येथे काल महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांच एका मंचावर दिसले. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली. शिवाजी पार्क येथे भाषणे करायला भाडोत्री माणसे घेऊन लोक उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा करीत आहेत. तसा प्रयत्न तर करून बघा, महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. तसेच भाजपला ज्या मतदारसंघात पराभव दिसतोय, तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे, असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महायुतीची शिवाजी पार्क येथील सभा आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र, भाजपला ज्या मतदारसंघात पराभव दिसतोय, तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे केल्यानंतर एकच खळबळ माजली.उद्धव ठाकरे म्हणाले की, "ज्या मतदारसंघात कमी मतदान होऊ शकते, अशा मतदारसंघात भाजपचे लोक मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावत आहेत. याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. नागरिकांना आवाहन करतो की, असा प्रकार कुठे दिसून आल्यास गप्प बसू नये."
यापूर्वी यवतमाळ- वाशिम मतदारसंघात मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. यवतमाळच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजेंद्र गायकवाड यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन हा प्रकार उजेडात आणला. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मोदींना हिंदुहृदय सम्राट व्हायचे आहे. परंतु, हिंदुहृदयसम्राट एकच आणि ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. जनतेने बाळासाहेबांना ही पदवी दिली होती. हिंदुहृदयसम्राट होता येत नाही म्हणून त्यांचे पोट दुखत आहे. यामुळेच त्यांनी शिवसेना फोडली. मात्र, त्याच शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्रे वापरून मते मागण्याची वेळ भाजप आणि मोदींवर आली. शिवसेनेला हिंदुत्त्व शिकवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या