Uddhav Thackeray On Election Commission Of India: देशात १९ एप्रिल २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. देशात आणि महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात अनुक्रमे ६२.३७ आणि ५५.२९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीचा दुसरा टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र, यापूर्वीच निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाला नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली. ज्यात ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी आणि हिंदू धर्माचा उल्लेख करणारा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नुकताच उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "निवडणुकांसाठी प्रेरणा गीत लागते. म्हणून आम्ही मशाल गीत काढले. मात्र, निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवून दोन शब्द काढले. निवडणूक आयोगाने 'हिंदू तुझा हा धर्म जाणून घे हे मर्म' यातील हिंदू धर्म शब्द काढायला लावला. तसेच बॅकग्राऊंडमधील जय भवानी, जय शिवाजी घोषणेतील जय भवानी शब्द काढण्यास सांगितले."
आम्ही देखील रामभक्त आहोत, हनुमान भक्त आहोत. आई तुळजा भवानी राज्याचे दैवत आहे. जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे. ही हुकूमशाही आहे, असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत शब्द काढणार नसल्याचे सांगितले.
मोदी यांनी कर्नाटक निवडणुकीत बजरंग बलीच्या नावाने मते मागितली होती. तर अमित शाह यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत रामलल्लाचं फ्री दर्शन घ्यायचं असेल तर भाजपला मत द्या, असं म्हणाले होते, याचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दाखवला. यांच्यावर काय कारवाई केली, ते आधी सांगा, असे ठाकरे म्हणाले.