Maval Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झालं नसतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. एवढंच नव्हे, उरण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारही घोषित केला आहे.
रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी काल काही जाहीर सभा घेतल्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghere Patil) यांची उमेदवारी घोषित केली. तर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उरण मतदारसंघातून मनोहर भोईर यांचं नाव जाहीर केलं. शिवसेनेची उमेदवारी सर्वसाधारणपणे पक्षाचं मुखपत्र 'सामना'तून जाहीर केली जाते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघाचा दौरा करत असतानाच उमेदवारांची घोषणा केल्यानंही आश्चर्य व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस येत्या लोकसभा निवडणुकीत एकजुटीनं भाजपच्या नेतृत्वाखालील युतीविरुद्ध लढणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जागावाटप कसे होणार? कोणत्या पक्षाचा उमेदवार कोणत्या जागेवर लढणार याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर झालेलं नाही. असं असतानाच उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांचा भाग येतो. मागील वेळेस शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळमधून निवडून आले होते. बारणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळं राज्यभरात त्याचं नाव गाजलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. विद्यमान खासदार म्हणून साहजिकच त्यांनी पुन्हा एकदा या जागेवर निवडणुकीची तयारी केली आहे. मात्र, अता अजित पवार हे महायुतीसोबत असल्यामुळं त्यांचा पक्षही मावळच्या जागेसाठी इच्छुक आहे. त्यांनीही मावळमध्ये लोकसभेसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळं महायुतीनं अद्याप कोणाचंही नाव जाहीर केलेलं नाही.