Baramati Lok sabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे नणंद-भावजयीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. राष्ट्रीवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. पवार घराण्याकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली जात आहे. सुप्रिया सुळे (supriya sule) व सुनेत्रा पवार (Sunetra pawar) दोन्ही उमेदवारांकडून आजच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे म्हटले आहे.
दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उमदेवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन्ही उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण भरावे लागते. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रात खुलासा करण्यात आला आहे की, सुप्रिया सुळे ज्यांच्याविरुद्ध लढणार आहेत, त्याच सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उसणे घेतले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर भावजय आणि भाच्याचं एकूण ५५ लाखांचं कर्ज असल्याचे समोर आले आहे.
सुप्रिया सुळे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आपण वहिनी सुनेत्रा पवार आणि भाचा पार्थ पवार यांच्याकडून एकूण ५५ लाखांचं कर्ज घेतले आहे. यापैकी पार्थ पवार यांच्याकडून २० लाख रुपयांचं तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. याशिवाय सुप्रिया सुळे यांनी कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नव्हते. सुप्रिया सुळे शेतीतून शुन्य उत्पन्न मिळत असल्याचे म्हणत १४२ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांचे सन २०२२-२३ या वर्षात ४० लाख ७३ हजार इतके उत्पन्न होतं. त्यांच्याकडे चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम आहे. बँकांमधील ठेवी, शेअर्स, पोस्टांमधील ठेवी, वाहने, सोनं अशी मिळून अमोल कोल्हे यांच्याकडे एकूण ८२ लाख ३९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. एक पजेरो कार तर दुसरी बुलेट आहे. तर यांना बारा लाख रुपयांची येणी आहेत
संबंधित बातम्या