Maha Vikas Aghadi: मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवी येथील पी.डब्लु.डी. मैदानावर इंडिया आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. तसेच मराठी माणसांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला अल्टिमेटम दिले.
ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहचवले, त्यांनाच तुम्ही नकली शिवसेना म्हणता. तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीत वार केला आहे. महाराष्ट्रातील सगळे उद्योग- धंदे गुजरातला पळवले. प्रेमाने अलिंगन दिले, तर आम्हीही देवू. पण पाठीत वार केला तर, वाघनखाने पलटवार करू. जो महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच ४ जूननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त नरेंद्र मोदी राहतील. यंदा इंडिया आघाडीचा पंतप्रधान होईल. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदींना काल बोललेले आज आठवत नाही. अच्छे दिन म्हणत १५ लाख खात्यात येतील, असे म्हटले होते. हे पैसे भाजपच्या खात्यात गेले. त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्र्यांचे पतीने इलेक्ट्रॉल बॉण्ड हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. कंत्राटी पद्धत आणली. मी कायमस्वरुपी, बाकी सगळे कंत्राटी, असे मोदींचे धोरण आहे. पण, आता आम्ही तुमचे कंत्राट संपवणार असून ४ जूनला कंत्राटमुक्त करू.
मावळवासियांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत असलेली निष्ठा आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर असलेसे प्रेम ह्या सभेत स्पष्ट दिसून आले.येत्या निवडणूकीत हुकूमशाहीला पाणी पाजण्यासाठी आणि निष्ठावंत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे, हा निर्धार उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसला, अशा आशयाचे ट्विट उद्धव ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले. या सभेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, आप पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, आमदार सचिन अहिर, तेजस ठाकरे तसेच इंडिया - महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
संबंधित बातम्या