Sharad Pawar Speech In Kolhapur Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेससह राज्यातील इतर राजकीय पक्षाने प्रचाराला सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सहा सभा घेतल्या. कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची नुकतीच कोल्हापुरात सभा झाली. या सभेत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. देशातील जनता महागाई, बेरोजगारी यांसारख्या गंभीर समस्येशी लढत असताना मोदींचे जनतेला मुद्यांपासून वळवण्याचे काम सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ७ मे २०२४ रोजी ११ ठिकाणी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी कोल्हापूरात सभा घेतली. या सभेत मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, जनता मोदी सरकारवर नाराज आहे. मोदींना गेल्या निवडणुकीपेक्षा महाराष्ट्र कमी जागा मिळतील,असा दावा शरद पवार यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यांत होत आहे. यावरून शरद पवारांनी मोदींवर टीका केली. महाराष्ट्रात सात टप्प्यात निवडणूक कशासाठी, एका टप्प्यात निवडणूक होऊ शकत होती. महाराष्ट्रात अधिक ठिकाणी जाता यावे म्हणून मोदींनी जाणीव पूर्वक पाच टप्प्यात निवडणूक घेतली जात आहे.
नरेंद्र मोदी हे फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. मोदींकडे मुद्दे नाहीत, त्यामुळे ते भटकटवत आहेत. त्यांच्या भाषणातील पहिले तीन- चार वाक्य स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेली असतात. स्थानिक मुद्द्यावरून भाषण करण्याची मोदींची स्टाईल आहे”, असे म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.