‘ज्या व्यक्तीनं अजित पवारांच्या मुलाचा दारुण पराभव केला, त्याच माणसाचा निवडणूक अर्ज आज त्यांना भरावा लागतोय आणि त्याचा प्रचार करावा लागतोय, यावरून अजित पवारांची परिस्थिती काय आहे हे समजू शकतं,’ अशी खोचक टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवडला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मावळ लोकसभेबरोबरच रोहित पवार यांनी यावेळी पवार कुटुंबीयांतील मतभेदांवर व अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केलं. 'पिंपरी-चिंचवडमधील वातावरण मशालच्या बाजूनं वातावरण आहे. संजोग वाघेरे हे इथले नवे खासदार असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजप व महायुतीसोबत जाण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवर रोहित पवार यांनी सडकून टीका केली. 'अजित पवार हे साहेबांना (शरद पवार) वडील मानायचे. वडिलांना सोडून स्वत:चं साम्राज्य राखण्यासाठी, तपास यंत्रणांच्या कारवायांपासून लपण्यासाठी ते भाजप आणि महायुतीसोबत गेले आहेत. हा निर्णय घेताना त्यांनी वडिलांचा विचार केला नाही. इतकंच काय, ज्यांनी प्रचंड मताधिक्यानं त्यांच्या मुलाचा (पार्थ पवार) पराजय केला, त्याचाच फॉर्म भरण्यासाठी ते येत आहेत. त्यावरून त्यांची आजची परिस्थिती काय आहे हे समजतं, असं रोहित पवार म्हणाले.
'पार्थचा पराभव दादा विसरले असतील. पण मी काही विसरलेलो नाही. ज्या श्रीरंग बारणे यांनी पार्थचा पराभव केला होता, त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मी इथं आलो आहे. त्यावेळी पार्थसाठी काम करणारे कार्यकर्ते अजूनही साहेबांसोबत आहेत. ते लोकही श्रीरंग बारणे यांच्या विरोधात लढत आहेत. मी या सगळ्याला बदला वगैरे म्हणणार नाही. संजोग वाघेरे यांना निवडून आणणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी जे काही खरं आहे ते मी बोलेन, असंही रोहित पवार म्हणाले.
पार्थ पवारांना वाय ऐवजी झेड सेक्युरिटी मिळायला हवी होती. जी सुरक्षा पंतप्रधान मोदींना आहे, त्याच प्रकारची द्यायला हवी होती. देवेंद्र फडणवीस हे नेत्यांना, त्यांच्या मुलांना सुरक्षा देतात, आमदारांना सुरक्षा देतात. पण जिथं कोयता गँग आहे. गोळीबार होतो. सामान्य लोक अडचणीत असतात, तिथं सुरक्षा दिली जात नाही. मला वाटतं पुढंमागे दोन रणगाडे दिले तरी त्याचा फायदा आम्हाला होईल. कारण लोक महायुतीच्या व भाजपच्या विरोधात आहेत, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या