मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray: राज ठाकरे यांचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ; यंदा कोणाकडं दाखवलं बोट?

Raj Thackeray: राज ठाकरे यांचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ; यंदा कोणाकडं दाखवलं बोट?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 12, 2024 10:33 PM IST

Raj Thackeray Thane Sabha: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची आज ठाण्यात सभा पार पडली.

Raj Thackeray: राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा पार पडली.
Raj Thackeray: राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा पार पडली.

Lav Re Toh Video: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, यावेळी राज ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला बिनशर्त पाठिंबा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सुरुवात केली. कणकवली आणि पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्यानंतर राज ठाकरेंची आज ठाण्यात सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत व्हिडिओ लावला. मात्र, हा व्हिडिओ मोदींचा नसून शिवसेना नेत्या सुषभा अंधारे यांचा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ असे म्हणत सुषमा अंधारे यांचा जुना व्हिडीओ दाखविला. या व्हिडिओत सुषभा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख म्हातारा असा उल्लेख केला. हा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तुमचे वडिलांवर प्रेम असते तर बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या सुषमा अंधारेंना पक्षात घेऊन प्रवक्ते पद का दिले? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

आनंद दिघेंच्या सोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध

"सभेला यायच्या आधी आनंद मठात गेलो होतो, तेंव्हा सगळे जुने दिवस आठवले. आनंद दिघेंच्या सोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्यासोबत ठाणे फिरताना मजा यायची. मी बाळासाहेबांसोबत अनेकदा ठाण्याला आलो आहे. तेंव्हाच ठाणे खूप सुंदर आणि टुमदार शहर होते. पण आज सगळे चित्र बदलले आहे. एके काळचं तलावांच शहर टँकरचे शहर झाले. काँक्रीटचे जंगल झाले आहे हे शहर", असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलता आलेच पाहिजे

पुढे राज ठाकरे म्हणाले की, "कोणी म्हणतील की हा संकुचित विचार आहे. अजिबात हा संकुचित विचार नाही, इथे अनेक वर्ष गुण्यागोविंद्याने नांदणारे अमराठी लोकं पण आपलेच आहेत. अट फक्त एकच, महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलता आलेच पाहिजे. आम्ही जर तुमच्या राज्यात आलो तर तुमची भाषा शिकू, अर्थात आम्ही बाहेरच्या राज्यात येणार नाही."

फोडाफोडीच्या राजकारणाचे समर्थन कधीच करणार नाही

ही पहिली निवडणूक आहे जिला विषय नाही. त्यामुळे एकमेकांना घाणेरड्या शिव्या देणे इतकेच सुरु आहे. बरे, एकीकडे काय रडारड सुरु आहे, 'वडील चोरले'. मी फोडाफोडीच्या राजकारणाचे समर्थन कधीच करणार नाही. आज तुम्ही आघाडी करून जे बसला आहात त्याकडे आधी बघा. माझे ७ पैकी ६ नगरसेवक यांनी खोके देऊन फोडले, अरे चोरले कशाला? मागितले असते तर देऊन टाकले असते", असेही राज ठाकरे म्हणाले.

WhatsApp channel