Hemant Godse : नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजप नेते संतापले; असहकाराचा इशारा
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Hemant Godse : नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजप नेते संतापले; असहकाराचा इशारा

Hemant Godse : नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजप नेते संतापले; असहकाराचा इशारा

May 01, 2024 02:05 PM IST

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर भाजपमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप नेते संतापले!
नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप नेते संतापले!

Hemant Godse Nashik Lok Sabha Candidate : महायुतीच्या जागावाटपात सर्वाधिक कळीचा ठरलेला नाशिक लोकसभा मतदारंसघ अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. या मतदारसंघातून शिंदे गटानं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच त्यांचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपनं तीव्र नाराजी व्यक्त करत असहकार पुकारण्याची भूमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास महिना उलटून गेला तरी महायुतीच्या अनेक उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकली नव्हती. त्यात नाशिकचा मतदारसंघ एक होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले हेमंत गोडसे हे इथले विद्यमान खासदार आहेत. त्यामुळं त्यांनाच ही जागा मिळेल अशी अपेक्षा होती. मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी एका सभेत तशी घोषणाही केली. मात्र, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यास तीव्र विरोध झाला. या विरोधामुळं गोडसे यांच्या नावाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडली.

मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा इथं सुरू झाली. खुद्द अमित शहा यांनीच आपलं नाव सुचवल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र, घोषणा न झाल्यानं उमेदवारीच्या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली. असं असलं तरी भाजपचा दावा कायम होता. भाजपकडून दिनकर पाटील हे स्थानिक नेते इच्छुक होते.

भाजपच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडूनही इतर नावांची चाचपणी सुरू झाली. त्यात अजय बोरस्ते हे प्रमुख नाव होते. मंगळवारी या संदर्भात भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये शेवटची सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं.

स्थानिक पातळीवर भाजपची नाराजी कायम

वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर हेमंत गोडसे यांचं नाव निश्चित झालं असलं तरी स्थानिक पातळीवर भाजपमध्ये नाराजी कायम आहे. हेमंत गोडसे यांना भाजप नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा विरोध आहे. हेमंत गोडसे हे दहा वर्षांत लोकांना भेटलेही नाहीत, असं भाजपचे नेते दिनकर पाटील म्हणाले.

भाजपनं नाशिकच्या जागेवरचा दावा सोडल्याचं समजताच दिनकर पाटील भडकले होते. इतकंच नव्हे, हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यास पराभव अटळ आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते त्यांची कशी समजूत घालतात यावर बरंच काही अवलंबून असेल.

Whats_app_banner