EVM Viral Video : एकाच मतदाराने भाजपला ८ वेळा मतदान दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. यावरून सपा, काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला घेरले होते. अखिलेश यादव यांनी X वर पोस्ट करत लिहिले होते की, जर निवडणूक आयोगाला वाटत असेल की,हे चुकीचे आहे तर काही कारवाई जरूर करा. भाजपची बूथ कमेटी,लूट कमेटी आहे. यानंतर खळबळ उडाली होती. निवडणूक आयोगाने कारवाई करत अधिकाऱ्यांना निलंबित केले असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणालाही अटक करण्यात आली आहे.
देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत. १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. यावेळी एटा येथील अलीगंज विधानसभा मतदारसंघात बनावट मतदानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका तरुणाने वेगवेगळ्या बुथवर जाऊन वेगवेगळ्या नावाने भाजपला ८ वेळा मतदान केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. दरम्यान, या व्हिडोबाबत तपासात अनेक खुलासे झाले आहेत. या बूथवर ६९.२२ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. मात्र यावेळी केवळ १० मतदारांनी मतदार ओळखपत्राचा वापर असल्याचे समोर आले आहे.
व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाने स्वत: व्हिडीओ बनवून पोस्ट केला नसता तर हा प्रकार समोर आला नसता. भाजपसह विरोधी पक्ष प्रशासनावर आरोप करत आहेत. सध्या आयोगाने येथे फेर मतदानाची तारीखही जाहीर केली आहे. येथे २५ मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे.
फर्रुखाबाद मतदारसंघातील मतदानाच्या एका आठवड्यानंतर, रविवारी, येथील अलीगंज विधानसभा मतदारसंघातील खिरिया पावरण यांच्या बूथचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक तरुण एक-एक करून आठ बूथवर जाऊन भाजप उमेदवाराला मत देत आहे. यासोबतच तो मोबाईलवरून व्हिडिओही बनवत आहे. तो ज्या पद्धतीने मतांची मोजणी करत आहे, त्यावरून जणू त्याला कोणीतरी बनावट मतदानाचे काम दिले असल्याचा दावा केला जात आहे.
यावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर अखिलेश यादव यांची पोस्ट रिपोस्ट करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते की, त्यांचे सरकार आल्यावर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व राजकीय पक्षांच्या टीकेनंतर निवडणूक आयोग खडबडून जागे झाले व काही तासांतच बूथवर तैनात अधिकाऱ्यांना निलंबित करून व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. पोलिसांनी मतदान अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तेथे मतदान करणाऱ्यांपैकी फक्त १० जणांनी मतदान कार्ड वापरल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट मतदान झाल्याची तक्रार केली जात आहे.
संबंधित बातम्या