Lok Sabha election 2024 : देशासह राज्यातील ११ मतदारसंघात आज लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. मात्र संपूर्ण राज्याची नजर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागली आहे. या मतदारसंघात सकाळपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशिर्वाद घेतले, तर रोहित पवारांनी मतदारसंघात अजित पवार गटाकडून पैसे वाटप व दमदाटी करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला. ता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर चाकणकरांवर गुन्हा (Fir against Rupali chakankar) दाखल करण्यात आला आहे.
रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. खडकवासाला परिसरातील एका मतदान केंद्रावर आज सकाळी रुपाली चाकणकर गेल्या होत्या. सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी मतदान सुरु होण्याआधी त्यांनी औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केला. त्यांनी ताटात दिवा, अगरबत्ती आदी पूजेचे साहित्य ठेवले होते. मतदान केंद्रात जाऊन त्यांनी तेथे ठेवलेल्या ईव्हीएम मशीनची विधीवत पूजा केली. मात्र या प्रकारमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मतदान करण्यासाठी आलेल्या रुपाली चाकणकर औक्षण ताट आणि पूजेचे साहित्य घेऊन कशासाठी आल्या असतील, असा प्रश्न तेथे उपस्थित निवडणूक अधिकारी व मतदारांना पडला. मतदान केंद्रावरील कर्मचारीही विस्फारलेल्या नजरेने हे पाहत होते. चाकणकर ईव्हीएमची पूजा करत असल्याचे पाहून तेथे उपस्थित सर्व लोक चक्रावले.
मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाविरोधात आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग होता. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यानेच याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांनकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रकाराची एकच चर्चा रंगली आहे. अनेकांनी यावरून चाकणकर यांना ट्रोल केले आहे.
संबंधित बातम्या