मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असून अनेकठिकाणी संथ गतीने मतदान होत असून अनेक मतदार मतदान न करताच माघारी गेल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचे दिसत आहे. मतदारांना तासनतास मतदान केंद्रावरील रांगेत ताटकळत बसावं लागलं आहे. त्यामुळे मतदार परत जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ट्विट करून दिली आहे.
आज (२० मे) सायंकाळी ६ वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील मतदानाच्या रांगेत उभे असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी मतदारांना यासंदर्भात आवाहन केले आहे.
पवई येथील दोन मतदान केंद्रांवर अत्यंत धीम्या गतीने मतदान झालं. त्यामुळे मतदारांना काही तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागले. लांबच लांब रांगा आणि उन्हाचा तडाखा यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परत माघारी फिरले
मुंब्रा येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर अशीच परिस्थिती असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
दरम्यान मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. ज्या भागात शिवसेनेला चांगलं मतदान होत आहे, तेथे मुद्दाम मतदानास वेळकाढूपणा केला जात आहे. तसेच कितीही उशीर झाला तरी हटू नका मतदान करा, पहाटे पाच वाजेपर्यंत मतदान करा, रांगेतून हटू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केलं.
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पलटवार केला आहे, मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली आहे. आता, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. ४ जून नंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
संबंधित बातम्या