Rahul Gandhi On PM Modi: पाटण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चंदनजी ठाकोर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाटण येथील प्रगती मैदानावर मोठ्या सभेला संबोधित केले. या सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी चंदनजी ठाकोर यांना बहुमतांनी विजयी मिळवून देण्याचे मतदारांना आवाहन केले. या सभेला गुजरात काँग्रेसचे प्रभारी मुकुल वासनिक, गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शकित सिंह गोहिल यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी राम मंदिरच्या सोहळ्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. राम मंदिरच्या सोहळ्यात फक्त श्रीमंत लोक दिसले. परंतु, एकही शेतकरी आणि मजुराला आमंत्रित करण्यात आले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी जय अंबाजी म्हणत आपल्या सभेला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी यांनी संविधान, बेरोजगारी, अग्निवीर भरती आणि ओबीसी आरक्षणावरुन मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, देशात बेरोजगारी वाढली आहे.देशातील ९० टक्के लोकसंख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समुदायांची आहे. मात्र, तरीही त्यांना नोकरीसाठी झटावे लागत आहे. राहुल यांनी वचन दिले की, त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास अग्निवीर भरती बंद करेल.
पुढे राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, आपल्या देशात सध्या दोन भारत निर्माण झाले आहेत. राम मंदिराच्या उद्घाटन सोहाळ्यात फक्त श्रीमंत लोक दिसले. पण एकही गरीब, शेतकरी किंवा मजूर नव्हता. आदिवासी समाजातून आलेल्या आमच्या राष्ट्रपतींनाही आमंत्रित करण्यात आले नव्हते, असे राहुल गांधी म्हणाले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गुजरात आणि राजस्थानमध्ये पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एकच जागा मिळाली. गुजरातमध्ये लोकसभेच्या २६, मध्य प्रदेशात २९, राजस्थानमध्ये २५ आणि उत्तर प्रदेशमध्ये ८० जागा आहेत. या पक्षाला १६० पैकी फक्त दोन जागा जिंकता आल्या. यावेळीही काँग्रेससाठी हे सर्वात मोठे आव्हान असेल.
संबंधित बातम्या