BJP candidates in mumbai lok sabha election : 'अब की बार ४०० पार…' असा निर्धार करत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजप या लढाईत कोणतीही त्रुटी राहू नये या दृष्टीनं तयारी करत आहेत. निवडणुकीला सामोरं जाताना नव्या दमाचे व फ्रेश चेहरे देण्याकडं भाजपचा कल आहे. त्यामुळं मुंबईतील अर्ध्याहून अधिक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही मुंबईतील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तसंच, महापालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी आतापासूनच बांधबंदिस्ती केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आणि पुढील निवडणुकांमध्ये बाजी मारायची असं भाजपचं धोरण आहे. त्या दृष्टीनं आता पावलं टाकली जात आहेत.
मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन मतदारसंघात मूळ शिवसेनेकडं व तीन भाजपकडं आहेत. शिवसेनेकडील तीन मतदारसंघांपैकी दोन खासदार सध्या शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यापैकी दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांना उमेदवारी मिळणं निश्चित मानलं जात आहे. मात्र, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपला हवा आहे. तिथं आमदार अमित साटम यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार आहे. त्यामुळं गजानन कीर्तिकर यांचा पत्ता कट होणार असल्याचं मानलं जात आहे. दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांची लढत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी होईल.
सध्या भाजपकडं असलेल्या उत्तर मध्य, उत्तर आणि ईशान्य मुंबईतील तिन्ही उमेदवार बदलले जाण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांच्या ऐवजी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी आमदार पराग शाह यांच्या नावाची चर्चा आहे.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना मुंबईत चार जागा लढण्याची शक्यता आहे. त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबईचा समावेश आहे. उत्तर आणि उत्तर मध्य या दोन जागा काँग्रेसच्या खात्यात जातील. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांच्या विरोधात शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. तर, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील हे निवडणूक लढतील असं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या