Chhatrapati Shahu Maharaj: आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत; ते दत्तक आहेत, खासदार मंडलिकांचे वादग्रस्त विधान
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Chhatrapati Shahu Maharaj: आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत; ते दत्तक आहेत, खासदार मंडलिकांचे वादग्रस्त विधान

Chhatrapati Shahu Maharaj: आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत; ते दत्तक आहेत, खासदार मंडलिकांचे वादग्रस्त विधान

Published Apr 11, 2024 05:08 PM IST

Chhatrapati Shahu Maharaj : एका प्रचारसभेदरम्यान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. शाहू महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आले आहेत, असे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले आहे.

संजय मंडलिकांचे शाहू महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
संजय मंडलिकांचे शाहू महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

कोल्हापुरात लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असताना शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत (Chhatrapati Shahu Maharaj) केलेल्या वादग्रस्त विधानाने खळबळ माजली आहे. या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आताचे शाहू महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं विधान संजय मंडलिक (Sanjay mandlik controversial statement) यांनी केलं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून असून प्रतिस्पर्ध्यांवर टोकाचे आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यात थेट सामना होत हे. वंचितने शाहू महाराजांना पाठिंबा दिल्याने महाराजांची स्थिती मजबूत झाली आहे. दुसरीकडे शाहू महाराजांना रोखण्यासाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच संजय मंडलिक यांनी केलेल्या एका विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलं आहे.

महाविकास आघाडीने कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यानंतर कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र महायुतीने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना मैदानात उतरले आहे. त्यानंतर महायुतीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच प्रचारसभेदरम्यान संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

काय म्हणाले संजय मंडलिक?

नेसरीतील प्रचार सभेत बोलताना संजय मंडलिक म्हणाले की, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते गादीचे खरे वारसदार नाहीत. ते दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूरोगामी विचार जपला, येथे राहणारा प्रत्येक जण शाही विचार घेऊन जगतो, असं संजय मंडलिक म्हणाले. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार?असा सवालही मंडलिक यांनी केला. काही झाले की गादीचा अपमान झाल्याचा कांगावा केला जातो. संजय मंडलिकांच्या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतील - सतेज पाटील

शाहू महाराजांविषयी मंडलिकांनी वादग्रस्त विधान केल्यानं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. सतेज पाटील म्हणले मंडलिक स्वत:च्या स्वार्थासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. निवडणूक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाहू महाराजांवर होणारी असली टीका आम्ही सहन करणार नाही. कोल्हापूरची जनता याचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. याचे पदसाद कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात उमटतील. त्यांची याची माफी मागायला हवी.

Whats_app_banner

संबंधित बातम्या