Lok Sabha Election 2024: ‘किशोरी भैय्या, मला कधीच शंका नव्हती...’; प्रियांका गांधींनी केलं कौतुक!-kishori bhaiya i never doubted priyanka gandhi as congress takes lead in amethi ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election 2024: ‘किशोरी भैय्या, मला कधीच शंका नव्हती...’; प्रियांका गांधींनी केलं कौतुक!

Lok Sabha Election 2024: ‘किशोरी भैय्या, मला कधीच शंका नव्हती...’; प्रियांका गांधींनी केलं कौतुक!

Jun 04, 2024 03:31 PM IST

Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाच्या ताज्या अपडेटनुसार, काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा ९५,९६२ मतांनी आघाडीवर आहेत. तर, भाजपच्या स्मृती इराणी पिछाडीवर आहेत.

‘किशोरी भैय्या, मला कधीच शंका नव्हती...’; प्रियांका गांधींनी केलं कौतुक!
‘किशोरी भैय्या, मला कधीच शंका नव्हती...’; प्रियांका गांधींनी केलं कौतुक! (PTI)

Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत किशोरीलाल शर्मा यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याविरोधात आघाडी घेतल्याचे ताज्या अपडेटमध्ये समोर आले आहे. यानंतर प्रियांका गांधी-वाड्रा यांनी ट्वीट करत त्यांचे कौतुक केले आहे  प्रियांका गांधी यांनी किशोरीलाल यांच्यासोबतचा फोटो शेअर करत अमेठीच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.  

‘किशोरी भैय्या, मला कधीच शंका आली नाही, तुम्ही जिंकाल याची मला सुरुवातीपासूनच खात्री होती. तुमचे आणि अमेठीतील माझ्या प्रिय बंधू-भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!’, असे प्रियांका गांधी यांनी आपल्या  ट्वीटमध्ये म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या ताज्या कलानुसार शर्मा ९५,९६२ मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजपच्या स्मृती इराणी हे वृत्त लिहिपर्यंत पिछाडीवर होत्या. किशोरीलाल यांनीही सकारात्मक प्रवृत्तीला अनुसरून मतदारसंघातील जनतेचे आणि गांधी परिवाराचे आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठीत पत्रकारांशी बोलताना किशोरीलाल शर्मा म्हणाले की, ‘मी अमेठीच्या जनतेचे आणि गांधी कुटुंबाचे आभार मानू इच्छितो. मात्र, मतमोजणी पूर्ण होऊ द्या. त्यानंतर आम्ही बोलू’, असेही ते म्हणाले.

Mumbai North West Lok Sabha: रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोणाची विजयाच्या दिशेने वाटचाल?

स्मृती इराणी पिछाडीवर!

उत्तर प्रदेशातील अमेठी हा सर्व ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ आहे. शनिवारच्या एक्झिट पोलमध्ये स्मृती इराणी आणि केएल शर्मा यांच्यात चुरशीची लढत होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत गेली अनेक वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांचा पराभव केला आहे.

मात्र, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, ज्याचे प्रतिनिधित्व २००४पासून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी करत आहेत. सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष ३५ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ३४ जागांवर आघाडीवर आहे, ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत लक्षणीय घट आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या कलानुसार काँग्रेस सध्या सात जागांवर आघाडीवर आहे.