Raebareli : माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवतेय, त्याला प्रेम द्या; तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही - सोनिया गांधी
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raebareli : माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवतेय, त्याला प्रेम द्या; तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही - सोनिया गांधी

Raebareli : माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवतेय, त्याला प्रेम द्या; तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही - सोनिया गांधी

May 17, 2024 06:23 PM IST

Sonia Gandhi Raebareli Speech : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेला भावनिक आवाहन केलं आहे. माझा मुलगा राहुल याला मी तुमच्याकडं सोपवत आहे. त्याला माझ्याइतकंच प्रेम द्या,' असं सोनिया गांधी म्हणाल्या.

राहुलला मी तुमच्याकडं सोपवते, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीच्या मतदारांशी बोलताना सोनिया गांधी भावूक
राहुलला मी तुमच्याकडं सोपवते, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीच्या मतदारांशी बोलताना सोनिया गांधी भावूक

Sonia Gandhi Raebareli Speech : ‘आजवर तुम्ही मला आपलं मानलं. आपुलकीनं वागवलं, प्रेम दिलं. आज मी माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवत आहे. त्यालाही तेच प्रेम द्या. तो तुम्हाला निराश करणार नाही,’ असं भावनिक आवाहन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज रायबरेलीच्या जनतेला केलं.

वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणातून माघार घेतली आहे. त्या राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांच्या मतदारसंघातून राहुल गांधी हे निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या प्रचारापासून लांब असलेल्या सोनिया यांनी आज पहिल्यांदाच रायबरेलीतील सभेत मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रायबरेलीकरांना भावनिक साद घातली.

‘रायबरेली आणि अमेठी हे माझं कुटुंब आहे. आमच्या कुटुंबाची मुळं गेली १०० वर्षे या मातीशी जोडलेली आहेत. आजही तेच नातं कायम आहे. इंदिराजींच्या मनात रायबरेलीसाठी विशेष स्थान होतं. त्याचं तुमच्यावर अपार प्रेम होतं. सर्वांचा आदर करा. अन्याय आणि अधिकारांच्या रक्षणासाठी कुणाशीही लढावं लागलं तरी लढा. कारण तुमची संघर्षाची मुळं आणि परंपरा जुनी आहे. इंदिराजींनी आणि रायबरेलीच्या जनतेनं दिलेले हेच संस्कार मी राहुल आणि प्रियांकाला दिलेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

'तब्बल ३० वर्षे तुम्ही मला सेवेची संधी दिली. ही माझ्या जीवनाची सर्वात मोठी मिळकत आहे. त्याबद्दल अंत:करणापासून तुमची आभारी आहे. तुमच्या प्रेमामुळं मला कधीही एकटं वाटलं नाही. आज मी जी काही आहे, ते तुमच्यामुळंच आहे,’ अशी कृतज्ञताही सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.

राहुल गांधी यांच्या विरोधात कोण?

राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, रायबरेली हा गांधी कुटुंबाचा गड आहे. सोनिया गांधी यांनी इथं अनेक विकासकामं केली आहेत. त्यामुळंच २०१४ आणि २०१९ मध्ये अनेक गडकिल्ले ढासळत असतानाही सोनिया गांधी इथं मोठ्या फरकानं निवडून आल्या होत्या. राहुल गांधी हे विजयाची ही परंपरा कायम राखतात का हे ४ जूनला कळणार आहे.

प्रियांका गांधी यांचा भाजपवर निशाणा

या जाहीर सभेला संबोधित करताना प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'संपूर्ण देश पाहत आहे. समाजवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा महापूर झाला आहे. रायबरेलीशी माझ्या कुटुंबाचं असलेलं नातं आणखी घनिष्ठ करण्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. गरीब, शेतकरी, मजूर, महिला दहा वर्षांपासून अडचणीत आहेत. नरेंद्र मोदी कोणाचंही ऐकत नाहीत. आज देशात हुकूमशाही विरोधात वादळ आलं आहे. रायबरेलीच्या जनतेनं १०० वर्षांपूर्वी आवाज उठवला होता. पुन्हा एकदा रायबरेली सत्ता परिवर्तनासाठी देशाला आवाज देत आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

Whats_app_banner