मराठी बातम्या  /  elections  /  Lok sabha Election : काँग्रेसच्या माजी आमदाराचा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश; वर्ध्यातून लढणार लोकसभा

Lok sabha Election : काँग्रेसच्या माजी आमदाराचा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश; वर्ध्यातून लढणार लोकसभा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 29, 2024 10:22 PM IST

Loksabha Election : काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे वर्ध्यातून ते ‘तुतारी’ चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसच्या माजी आमदाराचा  राष्ट्रवादीत प्रवेश
काँग्रेसच्या माजी आमदाराचा  राष्ट्रवादीत प्रवेश

 लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्व जागांवरील उमेदवार निश्चित झाले आहेत. मात्र महाआघाडी व वंचितमध्ये वाटाघाटी सुरू असल्याने वर्धा लोकसभा मतदारसंघात महाआघाडीकडून उमेदवार दिला नव्हता. मात्र वंचितने येथे उमेदवार दिला होता. ही जागा महाविकास आघाडीत शदर पवार गटाकडे आल्याने येथे उमेदवाराचा शोध सुरू होता. आता हा शोध संपला आहे. काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे वर्ध्यातून ते ‘तुतारी’ चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वीच येथे भाजपने उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर ‘वंचित’नेही २८ मार्च रोजी उमेदवाराची घोषणा केली. आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा शोध संपल्याने येथील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात होते. आज त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारीबाबतच संभ्रम दूर झाला आहे. 

मुंबईत शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर हा पक्षप्रवेश झाला. यावेळ वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, कामगार नेते आफताब खान आदी उपस्थित होते. 

अमर काळे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे वर्ध्यातील जागेचा तिढा जवळपास संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी काळे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांच्याही उमेदवारीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel