ayodhya lok sabha election result 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्या (पूर्वीचा फैजाबाद) लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. या जागेवर समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद निवडून आले. त्यांनी भाजपचे लल्लू सिंह यांचा ४८,१०४ मतांनी पराभव केला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
फैजाबाद हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो. सुरुवातीच्या काळात काँग्रेसनं इथं सलग चार वेळा विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर कधीही या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाला सलग विजय मिळालेला नाही.
नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपनं २०१४ आणि २०१९ साली पहिल्यांदा हा मतदारसंघ सलग दोनदा जिंकला. यावेळी हॅटट्रिक करण्याची संधी भाजपला होती. अयोध्येत राममंदिराच्या उभारणीमुळं पुन्हा एकदा ती संधी मिळेल अशी भाजपची अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा फोल ठरली.
भाजपकडून या जागेवर लल्लू सिंह हे निवडणूक लढवत होते. इथं काँग्रेस व सपाच्या आघाडीचे उमेदवार अवधेश प्रसाद मैदानात होते. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच अवधेश प्रसाद यांनी लल्लू सिंह यांच्यावर आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम राखली.
राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जातीय समीकरण आणि अयोध्येच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं जमीन संपादित करण्यात आलं, त्यामुळं लोकांमध्ये नाराजी होती. यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उठवलेला आरक्षण आणि संविधान बदलाचा मुद्दा प्रचारात चालला. याशिवाय कमकुवत झालेला बहुजन समाज पक्ष आणि या पक्षाची मतपेढी इंडिया आघाडीकडं वळवण्यात सपा व काँग्रेसला आलेलं अपयश याचा फटका भाजपला पडल्याचं दिसत आहे.
दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत यश न मिळालेल्या काँग्रेस आणि सपा युतीनं यावेळी लोकसभा निवडणुकीत एकजुटीनं काम केलं. त्यामुळं मुस्लिम मतं एकगठ्ठा इंडिया आघाडीच्या बाजूनं गेली. त्याच वेळी, ज्याच्या जोरावर भाजपला विजय मिळत होता, त्या आधारे हिंदू मतांचं विभाजन करण्यात भारत आघाडी यशस्वी ठरली. बसपची दलित मतं, ओबीसी, ब्राह्मण आणि ठाकूर मतदारांची नाराजी हे देखील इंडिया आघाडीच्या यशाचं कारण मानलं जात आहे. याशिवाय महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दाही लोकांना महत्त्वाचा वाटल्याचं दिसत आहे.