मराठी बातम्या  /  elections  /  Lok Sabha Election Date: देशात ७ टप्प्यात मतदान; ४ जून रोजी लागणार निकाल, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान!

Lok Sabha Election Date: देशात ७ टप्प्यात मतदान; ४ जून रोजी लागणार निकाल, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 16, 2024 04:08 PM IST

EC Announced LS Poll Dates: निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणूक आणि चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Election Commission Chief Rajiv Kumar
Election Commission Chief Rajiv Kumar

Lok Sabha Election 2024 Schedule: निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणूक आणि अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिसा या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. देशात आगामी लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी दिली.

लोकसभा निवडणूक १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे , चौथ्या टप्प्यासाठी १३ मे, पाचव्या टप्प्यासाठी २० मे, सहाव्या टप्प्यासाठी २५ मे आणि सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.

“भारतात लोकशाही हा सर्वात मोठा उत्सव आहे. भारताच्या या उत्सवाकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. भारतात यावर्षी ९७ कोटी मतदार आहेत. सगळ्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर आम्ही आता निवडणूक आयोग म्हणून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत आहोत. भारतात यावेली ९६ कोटी ८० लाख मतदार आहेत, ज्यात १९ कोटी ७४ लाख तरुण मतदार आहेत. देशातल्या १२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत वाढली आहे. २ लाख मतदार भारतात असे आहेत, ज्यांचे वय १०० हून जास्त आहेत. तर, १८ हजार तृतीय पंथीय आहेत”, अशीही माहिती राजीव कुमार यांनी दिली.

यावेळी लोकसभेच्या ५४३ जागांसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ५४५ जांगावर लोकसभा निवडणूक लढवण्यात आली. मात्र, अँगलो इंडियन समाजासाठी राखीव जागांची तरतूद रद्द करण्यात आल्याने खासदारांचा आकडा ५३४ इतका आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांना ५० टक्के जागा जिंकणे आवश्यक आहे. म्हणजेच २७२ जागा जिंकणारा पक्ष सत्तास्थापनेचा दावा करेल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तारखांची घोषणा सहा दिवस उशिराने झाली. २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीमध्ये सात टप्प्यांत झाली. त्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी झाली.

WhatsApp channel