
Lok Sabha Elections 2024 : राज्यात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गटाच्या महायुतीचं लोकसभा निवडणुकीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच शिंदे यांच्या शिवसेनेनं नाशिक लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात गोडसे यांच्या नावाची घोषणा केली. श्रीरामाचा धनुष्यबाण नाशिकमध्ये कायम राहील. हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून जातील, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. गोडसे यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
महायुतीमध्ये (Mahayuti) लोकसभेच्या जागांच्या संख्येवरून आणि काही जागांवरील उमेदवारांवरून रस्सीखेच सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघही त्यापैकीच एक होता. भाजपनं या मतदारसंघावर दावा केला होता. नाशिक लोकसभा मतदारसंघात तीन आमदार भाजपचे असल्यामुळं ही जागा आपल्यालाच मिळावी, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. स्वामी शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे इथून भाजपच्या निवडणूक लढतील अशी चर्चा होती. शांतिगिरी महाराजांनी या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची भेटही घेतली होती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्यासाठी जोर लावला होता. मात्र, त्यांचं नाव मागे पडल्याचं दिसतं.
हेमंत गोडसे हे मागील दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार आहेत. तत्पूर्वी, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना अपयश आले होते. मात्र त्यांनी लाखांहून अधिक मतं घेतली होती. गोडसे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळं ते विजयाची हॅटट्रिक करणार का, याविषयी उत्सुकता आहे.
श्रीकांत शिंदे यांनी जाहीर घोषणा केली याचा अर्थ काही जागांचा पेच सुटला आहे. नाशिकचा मतदारसंघ शिंदे गटाकडं आला आहे हे यातून स्पष्ट झालं आहे. मात्र, शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीराजे भोसले हे देखील नाशिकमधून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत होते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान त्यांचे नाशिकचे दौरे वाढले होते. मात्र, शाहू महाराजांनी कोल्हापूरमधून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळं आता संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता ते शाहू महाराजांच्या प्रचारात झोकून देणार आहेत.
संबंधित बातम्या
