Congress reaction on Shiv Sena Candidate list : महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप अंतिम झालं नसताना ठाकरेंच्या शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळं काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे. काही मतदारसंघातील उमेदवारांवर काँग्रेसचा आक्षेप असून उद्धव ठाकरे यांनी त्यावर फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आज लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात दक्षिण मध्य मुंबई आणि सांगली लोकसभेच्या जागेचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेनं अनिल देसाई यांना तर, सांगलीतून दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना तिकीट दिलं आहे.
दक्षिण मध्य मुंबई आणि सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेनेमध्ये रस्सीखेच होती. काँग्रेसनंही या दोन्ही जागांवर दावा केला होता. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळं ही जागा आपल्यालाच मिळावी असा काँग्रेसचा आग्रह होता. मात्र, कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडल्यामुळं सांगलीची जागा सोडणार नाही असा शिवसेनेचा पवित्रा होता.
दक्षिण मध्य मुंबईची जागा देखील काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांच्यासाठी मागितली होती. याच मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे यापूर्वी खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळं काँग्रेसनं या जागेवर दावा केला होता. मात्र, २०१९ मध्ये इथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचा ही जागा सोडण्यास विरोध होता. या दोन्ही जागांवरून वाटाघाटी सुरूच होत्या. असं असतानाच ठाकरेंनी उमेदवारीची घोषणा केल्यामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या सांगलीतील नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. तर, राज्यातील नेते बाळासाहेब थोरात व विजय वडेट्टीवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा जाहीर करणं हे योग्य झालं नाही. चर्चा सुरू असताना असं करणं चुकीचं आहे. आघाडीचा धर्म सर्वांनी पाळणं गरजेचं आहे. त्या जागांसाठी आमचा आजही आग्रह आहे. त्यामुळं शिवसेनेनं या जागांबाबत फेरविचार करावा, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करताना आघाडीचा धर्म पाळला असता तर अधिक बरं झालं असतं. काही जागांवरील चर्चा अद्याप संपलेली नाही. असं असताना उमेदवार घोषित करणं बरोबर नाही. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळं ठाकरे यांनी पुनर्विचार व्हायला हवा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.